भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना अॅडलेड येथे सुरु आहे. या कसोटीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारतीय फलंदाजांना या निर्णयाला योग्य न्याय देता आला नाही. भारताने पहिल्या सत्रात ५६ धावांत ४ बळी गमावले. तर चहापानाच्या वेळेपर्यंत भारताची अवस्था ६ बाद १४३ झाली होती. त्यामुळे भारताचा सामन्यात निभाव लागणे कठीण असल्याचा सूर सोशल मीडियामध्ये उमटला. या साऱ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट मात्र भारताला दिलासा देणारी ठरली.

भारताचा कर्णधार विराट कोहली याने या सामन्यात नाणेफेक जिंकली. २०१८ या वर्षात भारताचा हा परदेशात नववा कसोटी सामना आहे. या आधी झालेल्या ८ सामन्यांपैकी पाच सामने हे इंग्लंडच्या भूमीवर तर ३ सामने हे दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर खेळवण्यात आले. या आठ सामन्यांमध्ये केवळ एकाच सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली होती आणि महत्वाचे म्हणजे तो सामना भारत जिंकला होता. त्यामुळे नाणेफेकीनंतरचा हा योगायोग पुन्हा जुळून येणार का? हे पाहणे महत्वाचे ठरेल.

या व्यतिरिक्त आणखी एक बाब म्हणजे इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचा कर्णधार विराट कोहली याला एकही सामन्यात नाणेफेक जिंकता आली नव्हती. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मलिकेत पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकल्यामुळे मालिकेची सुरुवात सकारात्मक झाली आहे.