19 April 2019

News Flash

IND vs AUS : अॅडलेडचं शतक माझ्या सर्वोत्तम खेळीपैकी एक – पुजारा

पुजाराच्या शतकाने भारताचा डाव सावरला

अॅडलेडच्या मैदानावर चेतेश्वर पुजारा

ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडलेड कसोटीत भारताच्या चेतेश्वर पुजाराने शतकी खेळी करुन अडचणीत सापडलेल्या भारतीय संघाला सावरलं. 123 धावा करताना पुजाराने भारताला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. ऑस्ट्रेलियातलं पुजाराचं हे पहिलंच शतक ठरलं, तर एकंदर कारकिर्दीतलं पुजाराचं हे 16 वं शतक ठरलं. आपल्या या शतकी खेळीवर पुजारा सध्या भलताच खुश आहे. आपलं हे शतकं कसोटी क्रिकेटमधल्या सर्वोत्तम खेळीपैकी एक असल्याचं पुजाराने म्हटलं आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : आघाडीच्या फळीतल्या फलंदाजांनी जबाबदारीने खेळायला हवं होतं – चेतेश्वर पुजारा

“कसोटी क्रिकेटमधली माझी ही सर्वोत्तम खेळी होती. कदाचीत पहिल्या सर्वोत्तम 5 खेळींपैकी ही खेळी असेल. मला माझ्या खेळाची स्तुती करायला आवडणार नाही, मात्र माझ्या सहकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही खेळी माझ्या सर्वोत्तम खेळीपैकी एक होती”, पुजारा पत्रकारांशी बोलत होता. पुजाराने केलेल्या शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसाअखेरीस 9 गड्यांच्या मोबदल्यात 250 धावांपर्यंत मजल मारली. पुजाराने पहिल्या डावात 246 चेंडूंमध्ये 123 धावा केल्या.

चेतेश्वर पुजारा हा भारतीय कसोटी संघातला हक्काचा फलंदाज. मात्र भारताबाहेर पुजाराची कामगिरी मनासारखी होत नाही, असा त्याच्यावर आरोप केला जातो. याला उत्तर देताना पुजारा म्हणाला, “हो, माझ्यावर असा आरोप होतो. मात्र आपण ही भारतीय संघ मैदानावर किती सामने खेळतो ही गोष्टीही समजून घ्यायला हवी. जर आमचा संघ सर्वात जास्त सामने भारतात खेळत असेल तर साहजिकच माझी घरच्या मैदानावरील कामगिरी ही अधिक उजवी असेल.” पुजाराने आपली बाजू मांडली.

First Published on December 6, 2018 5:17 pm

Web Title: ind vs aus its one of my top 5 test knocks says pujara on his hundred
टॅग Cheteshwar Pujara