भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा डाव १५१ धावांवर आटोपला. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी सपशेल लोटांगण घातले. बुमराहने केवळ ३३ धावा देत ६ बळी टिपले. याशिवाय जाडेजाने २ तर इशांत आणि शमीने प्रत्येकी १-१ बळी टिपला. त्यामुळे पहिल्या डावानंतर भारताला २९२ धावांची आघाडी मिळाली.

 

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने बिनबाद ८ धावासंख्येवरून आज खेळाला सुरूवात केली. उपहारापर्यंत त्यांची अवस्था ४ बाद ८९ अशी झाली. पहिल्या सत्रात सलामीवीर फिंच ८ धावांवर माघारी परतला. पाठोपाठ हॅरिस २२ तर ख्वाजा २१ धावा करून तंबूत परतले. शॉन मार्श आणि ट्रेव्हिस हेड यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण उपहाराच्या विश्रांतीआधी शेवटच्या चेंडूवर मार्श १९ धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पेनने सर्वाधिक धावसंख्या केली. पेनने २२ धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावाता आले नाही.

त्याआधी भारताने पहिला डाव ७ बाद ४४३ धावांवर घोषित केला. भारताचा नवोदित सलामीवीर मयंक अग्रवाल याने ७६ धावांची खेळी करून भारताच्या डावाचा पाया रचला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भारताचा अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजारा (१०६) आणि कर्णधार विराट कोहली (८२) यांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने मोठी धावसंख्या उभारली. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने एकही गडी न गमावता २ बाद २७७ धावांपर्यंत मजल मारली होती. विराट कोहली आणि पुजारा बाद झाल्यानंतर मुंबईकर रहाणे-रोहित जोडीने मोर्चा सांभाळला. रहाणे (३४) बाद झाल्यानंतर रोहितने पंतच्या साथीने धावसंख्या ४०० पार पोहचवली. अखेर पंत ३९ धावांवर बाद झाला. पंतनंतर खेळपट्टीवर आलेला जाडेजाही लगेच माघारी परतला. पण कसोटी संघात पुनरागमन करणाऱ्या मुंबईकर रोहित शर्माने (६३*) अर्धशतकी खेळी करून चाहत्यांना खूश केले.