‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमातील वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आलेल्या के. एल. राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या भारतामधील मालिकेची दमदार सुरुवात केली आहे. करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमांमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भारतीय संघातील सलामीचा फलंदाज असणाऱ्या के. एल. राहुलबरोबरच अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या यांना ऑस्ट्रेलियन दौऱ्यावरुन तडकाफडकी परत बोलवण्यात आले होते. मात्र त्यानंतर ही बंदी मागे घेण्यात आली होती.

आज या प्रकरणानंतर के. एल. राहुल पहिल्यांदाच टीम इंडियाकडून मैदानात उतरला आणि त्याने भारतीय संघाला चांगली सुरुवात करुन दिली. राहुलने डावाच्या सुरुवातील मारलेले अनेक फटके त्याच्या खेळामधील सुधारणा दाखवत होते. कसोटी मालिकेमध्ये अयशस्वी ठरल्यानंतर राहुल कॉफी विथ करण प्रकरणात अडकल्याने त्याच्यावर खूप टिका झाली होती. मात्र आजच्या सामन्यामध्ये राहुलने टिकाकारांना आपल्या बॅटनेच उत्तर दिले आहे. आजच्या सामन्यात रोहित शर्मा लवकर बाद झाल्यानंतर विराटच्या सोबतीने राहुलने भारतीय संघाला आकार दिला. मात्र कोहलीही समोर फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला. त्यानंतर राहुलने आपला खेळ धोनीबरोबर सुरु ठेवत ३५ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. राहुलच्या या खेळीने त्याने आपली दावेदारी स्पष्ट केली होती.

एका खाजगी वाहिनीवरील चॅट शोमध्ये महिलांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर देशभरामध्ये पांड्या आणि राहुल या दोघांवर सर्वच स्तरामधून टिका झाली होती. या दोघांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नेटकऱ्यांपासून बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांनीही व्यक्त केली होती. मात्र शिस्तभंग समितीचा अहवाल येईपर्यंत या दोघांना खेळू देण्याचा निर्णय बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने घेतल्याने पांड्याला ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील शेवटच्या काही सामन्यांसाठी परत संघात स्थान देण्यात आले. तेथे त्यांने आपल्या अष्टपैलू खेळाने सर्वांना प्रभावित केले.

याच कार्यक्रमामध्ये पांड्या आणि राहुल यांनी कोहली आणि सचिनमध्ये कोहली सर्वोत्तम असल्याचे मत नोंदवले होते. यावरुन या दोघांना नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले होते. अनेकांनी या दोघांना क्रिकेटची जाण नसल्याची टिकाही केली होती.