विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दुसऱ्या वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियन संघावर ३६ धावांनी मात केली. या विजयासह भारतीय संघाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. फलंदाज आणि गोलंदाज यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे भारतीय संघाने या सामन्यात विजय संपादन केला. विशेषकरुन लोकेश राहुलची या सामन्यातली कामगिरी ही वाखणण्याजोगी ठरली. फलंदाजीत लोकेशने मधल्या फळीत भारताची बाजू सांभाळून घेत ८० धावा केल्या, याचसोबत यष्टींमागेही त्याची कामगिरी दाद देण्यासारखी होती.

ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेताना, राहुलने ५२ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांसह ८० धावा केल्या. याबरोबरच त्याने वनडेमध्ये एक हजार धावा पूर्ण करण्याचाही टप्पा पार केला. वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद एक हजार धावा करणारा राहुल तिसऱ्या क्रमांकाचा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि अंबाती रायडू यांना मागे टाकले आहे.

वनडेत सर्वात जलद १ हजार धावा करणारे भारतीय क्रिकेटपटू –

  • विराट कोहली – शिखर धवन : २४ डाव
  • नवज्योतसिंह सिद्धू : २५ डाव
  • लोकेश राहुल : २७ डाव
  • महेंद्रसिंह धोनी, अंबाती रायुडू : २९ डाव
  • संजय मांजरेकर : ३० डाव

या मालिकेतला अखेरचा सामना रविवारी बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर होणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोणता संघ बाजी मारुन मालिकेवर कब्जा मिळवतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – Video : पंतच्या जागी संधी मिळालेला लोकेश राहुल यष्टींमागेही चमकला