भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २४ फेब्रुवारीपासून क्रिकेट मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी दोनही संघ कसून सराव करत आहेत. भारताच्या भूमीवर या मालिका रंगणार आहेत, त्यामुळे भारताला विजेतेपदाची संधी अधिक असल्याचे म्हटले जात आहे. मात्र या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन याने भारतीय संघाला डिवचले आहे. हार्दिक पांड्या हा खूप चांगला खेळाडू असला तरीही ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉयनीस हा हार्दिकपेक्षा भारी आहे, असे विधान त्याने केले आहे.

मार्कस स्टॉयनीस हा जगभरात उत्तम कामगिरी करत असून त्याच्यात प्रचंड सुधारणा दिसून येत आहे. त्याला कसोटी क्रिकेटमध्ये अधिक संधी मिळाली नाही हे त्याचे दुर्दैव आहे. तो दर्जात्मक खेळ करतो. हार्दिकदेखील उत्तम क्रिकेट खेळतो. पण स्टॉयनीसचा खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मला भावतो. तो देशाला सामने जिंकवून देण्याच्या उद्देशाने मैदानात उतरतो. हार्दिकवरदेखील त्याच्या संघात हीच जबाबदारी असते. पण हार्दिकपेक्षा स्टॉयनीस ती जबाबदारी उत्तमपणे पार पाडतो, असे हेडन म्हणाला.

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स हा भारतासाठी आणि विशेषतः शिखर धवनसाठी डोकेदुखी ठरेल, असेही हेडन म्हणाला.