19 April 2019

News Flash

IND vs AUS : मिचेल स्टार्कने उधळली पुजारावर स्तुतीसुमने, म्हणाला…

चेतेश्वर पुजाराने शतकी खेळी केली

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व राहिले. भारताने पहिल्या दिवसअखेर ९ बाद २५० धावा केल्या. नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार विराट कोहली याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारतीय फलंदाजांनी बेजबाबदार फटके खेळले आणि विकेट्स गमावल्या. केवळ चेतेश्वर पुजाराने शतकी खेळी केली आणि भारताला समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहोचवले.

त्याच्या खेळीचे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने कौतुक केले. ‘अडलेडच्या खेळपट्टीवर भारताचे फलंदाज स्वतःला स्थिरावू शकले नाहीत. ठराविक अंतराने भारताचा संघ बळी गमावत राहिला. पण तसे असले तरीही चेतेश्वर पुजाराने एकाकी झुंज दिली. त्याने दडपणावर मात केली आणि अत्यंत झुंजार असे शतक झळकावले, अशा शब्दात त्याने पुजाराची स्तुती केली.

आम्ही उत्तम गोलंदाजी करत होतो. पहिले चार तास आमचे खेळावर पूर्ण वर्चस्व राहिले. पण पुजाराने आमच्या गोलंदाजीवर संयमी खेळी केली. दडपण असेल तर त्यावर मात करत डिओर्घकाळ खेळपट्टीवर टिकून राहण्याची कला पुजाराकडे आहे. त्यामुळे भारताने जी धावसंख्या उभारली, त्याचे संपूर्ण श्रेय पुजारालाच दिले पाहिजे, असेही स्टार्क म्हणाला.

या सामन्यात केवळ चेतेश्वर पुजाराने एकाकी झुंज देत शतकी खेळी केली आणि भारताला समाधानकारक धावसंख्या गाठून दिली. पुजाराने १२३ धावांची झुंजार खेळी केली.

First Published on December 6, 2018 6:33 pm

Web Title: ind vs aus mitchell starc praises cheteshwar pujara