ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यात भारताने ६ गडी राखून विजय मिळवत मालिकेची सुरुवात विजयाने केली. केदार जाधव आणि महेंद्रसिंह धोनीने केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाने दिलेलं २३७ धावांचं आव्हान पूर्ण केलं. केदार जाधवने नाबाद ८१ तर महेंद्रसिंह धोनीने नाबाद ५९ धावा काढल्या. या सामन्यात केदारने एक बळी घेत अष्टपैलू कामगिरी बजावली. या खेळीसाठी त्याला सामनावीराच्या किताबाने गौरवण्यात आलं. केदारने आपल्या या खेळीचं श्रेय धोनीला दिलं आहे.

सामन्यात एका क्षणाला भारताची अवस्था ९९/४ अशी झाली होती. मात्र यानंतर धोनी-केदार जाधवच्या भागीदारीने सामन्याचं चित्र पालटलं. या भागीदारीबद्दल केदारला विचारलं असता केदारने धोनीचं कौतुक केलं, “ज्या-ज्या वेळी मी धोनीसोबत फलंदाजी करत असतो त्यावेळी मला खूप गोष्टी शिकायला मिळतात. प्रत्येक गोष्ट शब्दात मांडता येणार नाही, पण धोनी सोबत असला की आत्मविश्वास वाढतो. धोनी सोबत असला की आपण आज चांगला खेळ करणार हा विश्वास आपसूकच आपल्याला येतो. तुमच्याकडून सर्वोत्तम खेळ करुन घेण्याची धोनीमध्ये ताकद आहे.”

अवश्य वाचा – IND vs AUS : भारतासाठी आनंदाची बातमी, धोनी फॉर्मात परतलाय ! जाणून घ्या ही आकडेवारी

फलंदाजीला आल्यानंतर आपण डोक्यात रणनिती आखून खेळ केल्याचंही केदारने सांगितलं. झॅम्पाला आपली विकेट द्यायची नाही हे आम्ही ठरवलं होतं. मधल्या षटकांमध्ये झॅम्पा खरंच प्रभावी गोलंदाजी करत होता. त्यामुळे त्याची षटकं सांभाळून खेळून काढायची असं आम्ही ठरवलं होतं. यानंतर मैदानावर आमचा जम बसत गेला. केदारने पहिल्या सामन्यादरम्यानची आपली रणनिती सांगितली. या मालिकेतला दुसरा सामना मंगळवारी नागपूरच्या मैदानावर होणार आहे.