ऑस्ट्रेलियाने रविवारी झालेल्या पहिल्या टी २० सामन्यात भारताला ३ गडी राखून पराभूत केले. २ षटकात १६ धावांची गरज असताना बुमराहने केवळ २ धावा देत २ बळी टिपले. पण शेवटच्या षटकात १४ धावांची गरज असताना उमेश यादवने अत्यंत असमाधानकारक गोलंदाजी केली आणि शेवटच्या चेंडूवर २ धावा काढून ऑस्ट्रेलियाने सामना खिशात घातला. या सामन्यात माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे. टी २० सामन्यात दुसऱ्या क्रमांकाची संथ खेळी करणारा तो भारतीय खेळाडू ठरला.

टी २० क्रिकेटमध्ये ३५ हून जास्त चेंडू खेळून इतक्या कमी धावा काढणारा धोनी हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. या यादीत रवींद्र जाडेजा पहिल्या स्थानावर आहे. जाडेजाने २००९ मध्ये इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स स्टेडियमवर झालेल्या टी २० सामन्यात त्याने ३५ चेंडूत अवघ्या २५ धावा केल्या होत्या. त्यानंतर रविवारी धोनीने ३७ चेंडू खेळून केवळ २९ धावा केल्या.

भारताने अवघ्या १२६ धावा केल्या होत्या. राहुल (५०) वगळता भारताचा कोणताही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. धोनीने काही प्रमाणात डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने अत्यंत संथ फलंदाजी केली. १८व्या षटकात धोनीने केवळ एक धाव काढली. १९व्या षटकात त्याला दोनच धावा करता आल्या. तर, अखेरच्या षटकात त्याला एक षटकार खेचता आला. धोनीच्या संथ खेळीमुळे अखेरच्या १२ षटकांत भारतीय संघाला फक्त ६१ धावाच करता आल्या.

दरम्यान, भारताने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १२६ धावा केल्या. राहुलने दमदार पुनरागमन केले. त्याने ३५ चेंडूत अर्धशतक झळकावले. यात त्याने ६ चौकार आणि १ षटकार लगावला. पण पुढच्याच चेंडूवर तो झेलबाद झाला. धोनीने ३७ चेंडूंमध्ये २९ धावांची खेळी केली. तर कोहलीने १७ चेंडूत २४ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याने धमाकेदार अर्धशतक ठोकले. त्याने ४१ चेंडूत अर्धशतक लगावत ५ चौकार आणि २ षटकार लगावले. त्यानंतर चौकार लगावून तो ५६ धावांवर बाद झाला. तर शेवटच्या षटकात मोक्याच्या क्षणी २ चौकार आणि २ वेळा चोरट्या दुहेरी धावा मिळवत ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला.