अॅडलेड कसोटीत ऋषभ पंतला यष्टीरक्षणाची जबाबदारी मिळाली आणि त्याने पहिल्याच संधीत महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली. ऋषभने सामन्याच्या पहिल्या डावात यष्ट्यांमागे ६ झेल टिपले आणि एकाच डावात यष्ट्यांमागे सर्वाधिक झेल घेण्याच्या धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली. महेंद्रसिंह धोनीने २००९ साली न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन येथे झालेल्या कसोटीत पहिल्या डावात ही कामगिरी केली होती. या कामगिरीबाबत प्रतिक्रिया देताना ऋषभ पंतने धोनी हा ‘देशाचा हिरो’ असल्याचे म्हटले आहे.

धोनी हा माझ्यासाठी संपूर्ण देशाचा हिरो आहे. धोनीने मला दडपणाच्या स्थितीत मैदानावर कशा पद्धतीने शांत राहायचे हे शिकवले. यष्टीरक्षक आणि व्यक्ती म्हणून मी त्याच्याकडून खूप काही शिकलो. तो जेव्हा आजूबाजूला असतो, तेव्हा मला अधिक आत्मविश्वास वाटतो. मला कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास मी त्याच्याशी त्याबाबत चर्चा करतो. धोनीदेखील मला लगेचच त्यावर उपाय सांगतो, असे तो म्हणाला.

यष्टिरक्षण करत असताना दबावाच्या स्थितीत शांत आणि संयमी कसे राहावे, हे मी धोनीकडून शिकलो. तुम्ही मैदानात असताना १०० टक्के खेळाकडे लक्ष दिले पाहिजे, हे मला त्याच्याबरोबर राहून समजले. मी कधीही विश्वविक्रमाचा विचार केला नव्हता. मी केवळ चांगली कामगिरी करायची या विचाराने खेळत होतो, असे इंग्लंडच्या जॅक रसेल याच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केल्यांनतर पंत म्हणाला.