महेंद्र सिंग धोनी हा एक अत्यंत हुशार चपळ आणि चतुर क्रिकेटपटू आहे. मैदानावर विविध डावपेच खेळून त्याने वारंवार त्याची ज्येष्ठता सिद्ध केली आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात केदार जाधव आणि विजय शंकर यापैकी विजयला शेवटचे षटक टाकायला द्यावे हा सल्ला देण्यातही धोनीचा वाटा होता. त्यामुळेच त्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ८ धावांनी निर्णायक विजय मिळवला. या सामन्यात धोनी आणखी एका कारणामुळे चर्चेत राहिला, ते कारण म्हणजे धोनीचा कुलदीपला दिलेला सल्ला…

टी २० मालिकेतील भारतीय गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरलेला मॅक्सवेल हा मैदानात होता. ऑस्ट्रेलियाला एका भक्कम भागीदारीची गरज होती. विराटने कुलदीप यादवला गोलंदाजी दिली. मॅक्सवेल थोडासा खेळपट्टीवर स्थिरावणार तोच धोनीने कुलदीपला एका विशिष्ट प्रकारची गोलंदाजी सातत्याने करण्याचा सल्ला दिला. कुलदीपनेही अगदी सूचनेप्रमाणे गोलंदाजी केली आणि मॅक्सवेल त्रिफळाचित झाला. मॅक्सवेलबद्दल धोनी नक्की काय म्हणाला ते व्हिडिओमध्ये पहा –

दरम्यान, नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. अनुभवी फलंदाज रोहित शर्मा (०), शिखर धवन (२१), अंबाती रायडू (१८) हे तिघे झटपट बाद झाले. पण विजय शंकरने ४६ धावांची खेळी केली. पहिल्या सामन्यात भारताला विजय मिळवून देणारी जोडी केदार जाधव (११) आणि महेंद्रसिंग धोनी (०) हे दोघे एका पाठोपाठ एक बाद झाले. कोहलीने एकीकडे झुंज देत शतक लगावले. त्याने चौकार लगावत कर्णधार कोहलीने आपले दमदार शतक ठोकले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील ४० वे शतक ठरले.

२५१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने सावध सुरुवात केली होती. पण चांगली सुरुवात मिळाल्यानंतर मोठी धावसंख्या उभारण्यात महत्वाचे खेळाडू अपयशी ठरले. पीटर हँड्सकॉम्बने झुंज देत ४८ धावा केल्या. नंतर मार्कस स्टॉयनीसने अर्धशतक (५२) ठोकले. पण या दोघांचे प्रयत्न तोकडे पडले. शेवटच्या षटकात दोन बळी टिपत विजय शंकरने भारताच्या विजयावर शिकामोर्तब केले. शंकरने सामन्यात अष्टपैलू कामगिरी केली. त्याने १५ धावा देत २ फलंदाज बाद केले. तसेच ४६ धावांची उपयुक्त खेळीही केली.