ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताने पहिल्या दिवसअखेर ९ बाद २५० धावा केल्या. कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना अॅडलेड येथे सुरु आहे. या कसोटीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारतीय फलंदाजांना या निर्णयाला योग्य न्याय देता आला नाही. भारताने पहिल्या सत्रात ५६ धावांत ४ बळी गमावले. तर चहापानाच्या वेळेपर्यंत भारताची अवस्था ६ बाद १४३ झाली होती. पुजाराने शतक ठोकले. याशिवाय, सामन्यात दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा रोहित शर्माने केल्या आणि तो लॉयनच्या गोलंदाजीवर बाद झाला.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली आणि रोहित शर्माला हनुमा विहारीच्या जागी संघात स्थान दिले. आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करण्याची रोहितने सुरुवात केली होती. रोहित शर्माने फटकेबाजी करत ६१ चेंडूत ३७ धावा केल्या. या खेळीत त्याने २ चौकार आणि ३ षटकार लगावले.

तो झपाट्याने अर्धशतकाकडे वाटचाल करत होता, पण नॅथन लॉयनच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो एकूण ७ वेळा बाद झाला. त्यापैकी ४ वेळा लॉयनने त्याला आपल्या जाळ्यात अडकवले.

दरम्यान, या सामन्यात पुजाराने सर्वाधिक १२३ धावा केल्या. त्याने २३९ चेंडूत शतक ठोकले आणि त्यानंतरच्या २२ धावा केवळ ७ चेंडूत ठोकल्या. कमिन्सने सुंदर क्षेत्ररक्षण करत त्याला धावचीत केले.