सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेच्या रुपानं भारताला पहिला झटका बसला. यातून भारतीय संघ सावरतोय असं वाटत असतानाच हेजलवूडच्या अचूक थ्रोने हनुमा विहारीलाही माघारी धाडलं. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय संघ बॅकफूटवर गेला. पुजारा एका बाजूनं किल्ला लढवत होता. पण दुसऱ्या बाजूनं त्याला साथ मिळत नव्हती. विहारी बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या पंतनं सामन्याची सुत्रे आपल्याकडे घेत आक्रमक फलंदाजी केली. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राखेर भारतीय संघानं चार गड्यांच्या मोबदल्यात १८० धावा केल्या आहेत. भारतीय संघ अद्याप १५८ धावांनी पिछाडीवर आहे. ऋषभ पंत २९ आणि पुजारा ४२ धावांवर खेळत आहेत.

तिसऱ्या दिवसाची सुरुवात भारतीय संघासाठी निरशाजनक झाली. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात शतकी खेळी करणारा अंजिक्य रहाणे चांगल्या सुरुवातीनंतर २२ धावांवर बाद झाला. कमिन्सच्या उसळत्या चेंडूचा अंदाच चुकल्यामुळे रहाणे क्लीन बोल्ड झाला. रहाणे बाद झाल्यानंतर धावांसाठी झगडणारा हनुमा विहारीही धावबाद झाला.

अडचणीत सापडलेल्या भारतीय संघाच्या मदतीला पुन्हा एकदा ऋषभ पंत धावून आला. तिसऱ्या दिवसावर ऑस्ट्रेलियाचा संघ वरचढ होतेय असं वाटत असताना पंतनं आक्रमक फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना सळो की पळो केलं. पंत ४५ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीनं २९ धावांवर खेळत आहे. तर पुजारा १४४ चेंडूत ४ चौकारासह ४२ धावांवर खेळत आहे.

दुसऱ्या दिवशी काय झालं?

रवींद्र जडेजाची प्रभावी फिरकी आणि शुभमन गिलचे दमदार अर्धशतक यामुळे धावांसाठी झगडणाऱ्या स्टीव्ह स्मिथची झुंजार शतकी खेळी पूर्णत: झाकोळली. सिडनी क्रिकेट मैदानाच्या पाटा खेळपट्टीवर स्मिथ (२२६ चेंडूंत १३१ धावा) आणि मार्नस लबूशेनने (१९६ चेंडूंत ९१ धावा) २ बाद २०६ धावसंख्येपर्यंत ऑस्ट्रेलियाला नेत पहिल्या तासाभरात आशा उंचावल्या. परंतु ऑस्ट्रेलियाचा संघ ४५०हून अधिक धावा पहिल्या डावात नोंदवेल, ही अपेक्षा फोल ठरली. या दोघांनंतर मिचेल स्टार्क (२४) वगळता एकाही फलंदाजाने खेळपट्टीवर फार काळ तग न धरल्याने ३३८ धावांत त्यांचा डाव आटोपला. जडेजाने ६२ धावांत ४ बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरुंग लावला. २ बाद १६६ अशी पहिल्या दिवशी आश्वासक सुरुवात करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ३३८ धावांत रोखलं. त्यानंतर, भारतीय डावात गिलने (१०१ चेंडूंत ५० धावा) कारकीर्दीतील दुसऱ्या कसोटीत पहिले अर्धशतक संयमाने झळकावले. नॅथन लायनला त्याने अप्रतिम कव्हर ड्राइव्हज फटकावले, तर कमिन्सच्या माऱ्याचा बचावात्मकरीत्या प्रतिकार केला. या २१ वर्षीय सलामीवीराने रोहित शर्माच्या (७७ चेंडूंत २६ धावा) साथीने २७ षटकांत ७० धावांची सलामी दिली. या मालिकेत प्रथमच भारताची सलामीची जोडी खेळपट्टीवर टिकाव धरू शकली. खेळ थांबला, तेव्हा अजिंक्य रहाणे (४० चेंडूंत ५* धावा) आणि चेतेश्वर पुजारा (५३ चेंडूंत ९* धावा) खेळत होते.