ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्यापुढे दुसऱ्या डावात भारतीय संघाची फलंदाजी ढेपाळली. त्यातच फलंदाजी करताना एक उसळता चेंडू शमीच्या  हाताला लागला. त्यामुळे त्याला फलंदाजी अर्धवट सोडावी लागली. दुसऱ्या डावात गोलंदाजी करण्यासाठी शमी न आल्यामुळे भारतीय संघासाठी दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती झाली आहे. कारण पहिल्या कसोटी सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली मायदेशी परतणार आहे. त्यातच आता मोहम्मद शमीच्या दुखापतीनं चिंता वाढवली आहे.

शमीच्या दुखापतीवर अद्याप भारतीय संघ व्यवस्थापकाकडून कोणतीही अपडेट आलेली नाही. मात्र, दुसऱ्या डावात तो गोलंदाजीसाठी न आल्यामुळे भारतीय संघाच्या चिंतेत भर पडली आहे. जर शमीची दुखापत गंभीर असेल तर भारतीय संघाची वेगवान गोलंदाजी कमकुवत ठरु शकते. कारण सैनी आणि सिराज यांच्याकडे अनुभवाची कमी आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजीची कमान बुमराह आणि उमेश यादव यांच्यावर राहणार आहे.

असा झाला शमी दुखापतग्रस्त

दोन्ही डावात अपयशी ठरल्यामुळे पृथ्वी शॉला पुन्हा सलामीला संधी मिळणार का? असाही प्रश्न भेडसावत आहे. त्यातच विराट कोहलीच्या अनुपस्थितीत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कोण येणार? हाही प्रश्न संघ व्यवस्थापनासमोर आहे. पृथ्वी शॉच्या अनुपस्थितीत राहुल आणि शुबमन गिल हे भारतीय संघासमोर पर्याय आहेत. राहुल आणि मयांक यांनी सलामीची जबाबदारी पार पाडल्यास चौथ्या क्रमांकासाठी शुबमन गिल हा एकमेव पर्याय भारतीय संघासमोर उपलब्ध आहे.  जाडेजाही दुखापतीतून सावरला आहे. त्याला संधी मिळणार का? शिवाय यष्टरक्षक वृद्धीमान साहाला दुसऱ्या सामन्यातही संधी मिळणार का? की पंतला संधी दिली जाणार? दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची निवड करणे कठीण जाणार आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी असे बरेच प्रश्न क्रीडा चाहत्यांच्या मनात आहेत….