भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेला अखेरीस आपला सूर गवसला आहे. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा टी-२० सामना खेळण्यासाठी सज्ज होत असताना अजिंक्यच्या नेतृत्वाखाली भारत आणि ऑस्ट्रेलिया अ संघात पहिल्या ३ दिवसीय सराव सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. परंतू अजिंक्यने अनुभवी चेतेश्वर पुजाराच्या साथीने महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. अजिंक्यने संयमी शतकी खेळीत कसोटी मालिकेआधी आपण फॉर्मात आल्याचं दाखवून दिलं आहे.

पहिल्या सराव सामन्यात भारताने पृथ्वी शॉ आणि शुबमन गिल या तरुण खेळाडूंना सलामीला संधी दिली. परंतू दोन्ही खेळाडू भोपळाही न फोडता माघारी परतले. अनुभवी हनुमा विहारीही फारशी चमक दाखवू शकला नाही. ३ बाद ४० अशी बिकट अवस्था असताना अनुभवी अजिंक्य आणि पुजारा या जोडीने महत्वपूर्ण शतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. ५४ धावांची खेळी करुन पुजारा जेम्स पॅटिन्सनच्या गोलंदाजीवर माघारी परतला.

परंतू पुजारा माघारी परतल्यानंतरही अजिंक्यने एक बाजू लावून धरत कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. एकीकडे इतर फलंदाज झटपट माघारी परतत असताना अजिंक्यने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा नेटाने सामना करत शतक झळकावलं. अजिंक्यने भारतीय संघाला द्विशतकी धावसंख्या ओलांडून देण्यातही मदत केली. कर्णधार विराट कोहली पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर माघारी परतणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेकडे भारतीय संघाचं नेतृत्व येईल. दरम्यान पहिल्या दिवसाअखेरीस भारतीय संघाने ८ गड्यांच्या मोबदल्यात २३७ धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार अजिंक्य रहाणे १०८ धावांवर खेळत आहे.