ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या कसोटीत भारताने पहिला डाव ७ बाद ४४३ धावांवर घोषित केला. ही भक्कम मजल मारण्यात पुजाराच्या शतकी खेळीचा सिंहाचा वाटा होता. पण पुजाराचे हे शतक त्या ह्या आजपर्यंतच्या कसोटी शतकांपैकी सर्वात संथ शतक ठरले. २८० चेंडूत अत्यंत संयमी खेळी करत त्याने आपले शतक झळकावले आणि ३१९ चेंडूत १०६ धावा करून बाद झाला. त्यामुळे जर भारत सामना हरला तर त्यास पुजारा जबाबदार ठरेल, असे अजब मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याने व्यक्त केले आहे.

शतकवीर पुजारा

 

भारतीय संघाने सुमारे दोन दिवस पूर्ण खेळून काढले. या कालावधीत भारतीय संघ खूप संथ खेळला. पुजाराने सुमारे दीड दिवस फलंदाजी केली आणि शतक ठोकले. जर येथून पुढे भारत हा सामना जिंकला तर पुजाराची खेळी कायम लक्षात ठेवली जाईल. पण जर भारताला उर्वरित ३ दिवसांच्या खेळात ऑस्ट्रेलियाला दोन वेळा बाद करता आले नाही, तर मात्र भारताच्या त्या स्थितीला पुजारा जबाबदार ठरेल, असे मत पॉंटिंगने मांडले.

IND vs AUS : शतकवीर पुजाराने केला संथ खेळीचा विक्रम

पुजाराने उत्तम शतक ठोकले यात वादच नाही. पण जेव्हा पुजारा मैदानावर असतो तेव्हा भारताला धावगती वाढवणे अत्यंत कठीण जाते. भारताकडे फटकेबाजी करणारे फलंदाज आहेत, पण ते तितके यशस्वी ठरताना दिसत नाहीत. पुजाराची मात्र मालिकेत २ शतके आहेत. पण जेव्हा मेलबर्नसारख्या सपाट खेळपट्टीवर सामना रंगतो, तेव्हा संथ खेळीमुळे काही वेळा सामना जिंकणे कठीण जाते. अशा वेळी संथ खेळी करणाऱ्या फलंदाजाला दोष दिला जातो, असेही त्याने नमूद केले.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या भूमीत एखाद्या भारतीय फलंदाजाचे हे तिसऱ्या क्रमांकाचे संथ शतक ठरले. सध्याचे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी १९९२ साली सिडनीच्या मैदानावर ३०७ चेंडूत शतक ठोकले होते. तर सुनील गावसकर यांनी १९८५ साली अडलेड च्या मैदानावर २८६ चेंडूत शतक लगावले होते.