भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चौथा आणि शेवटचा कसोटी सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित राहिला. पण भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची चार सामन्यांची कसोटी मालिका २-१ अशा फरकाने जिंकली. याबरोबरच पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका ऑस्ट्रेलियन भूमीत जिंकण्याचा इतिहास रचला.

ही मालिका सुरू होण्यापूर्वीच दोन्ही देशाच्या आजी-माजी खेळाडूंनी त्यांचे अंदाज वर्तवले होते. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग यानेही भविष्यवाणी केली होती. पण ते सारे पूर्णपणे चुकीचे ठरले. मालिकेच्या आधीच उस्मान ख्वाजा भारतीय कर्णधार विराट कोहलीपेक्षा अधिक धावा करेल असे त्याने म्हटले होते. पण या मालिकेत कोहलीने २८२ धावा केल्या आणि ख्वाजाने १९८ धावा केल्या. दुसरे म्हणजे, ऑस्ट्रेलिया ही मालिका २-१ अशी जिंकेल, असे तो म्हणाल होता. पण याच्या अगदी विरुद्धच झाले.

याशिवाय, मेलबर्न कसोटीमध्ये चेतेश्वर पुजाराच्या संथ खेळीवर पॉन्टिंगने ताशेरे ओढले होते. त्या सामन्यात त्याने ३१९ चेंडूमध्ये १०६ धावांची संथ खेळी केली होती. पण हा सामना भारताने १३७ धावांनी जिंकला होता.

पॉन्टिंगचे अंदाज चुकल्यानंतर नेटिझन्सनी त्याची खिल्ली उडवली.

दरम्यान, पुजाराला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले. या मालिकेत त्याने ५२१ धावा केल्या. त्यात ३ शतके आणि १ अर्धशतक समाविष्ट आहे.