ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऋषभ पंतला यष्टिरक्षक म्हणून संघात पक्के स्थान मिळाले. तेव्हापासून ऋषभ पंत स्टंम्पमागे उभे राहून स्लेजिंग करण्याबाबत अनेकदा चर्चेत आला आहे. तसेच ऋषभच्या कसोटी क्रिकेटमधील बेजबाबदार फटकेबाजीमुळेही त्याच्यावर टीका झाली. पण ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याने मात्र ऋषभची स्तुती केली आहे.

ऋषभ हा अतिशय प्रतिभावान खेळाडू आहे. आतापर्यंत आपण केवळ त्याची थोडीशीच फलंदाजी पाहिली आहे. पण जेव्हा जेव्हा तो फलंदाजीसाठी मैदानावर येतो, तेव्हा मी टीव्हीसमोरून हलत नाही. आणि तशातच जर त्याच्या फलंदाजीला सूर गवसला, तर त्याची फटकेबाजी पाहायला धमाल येते, असे मॅक्सवेल म्हणाला.

ऋषभने कसोटी क्रिकेटमध्ये अतिशय कमी सामने खेळले आहेत. पण त्यातही काही अविस्मरणीय खेळींचा समावेश आहे. एका सामन्यात त्याने रिव्हर्स स्कुप करत षटकार मारून शतक झळकावले आहे. अशा पद्धतीचा खेळ प्रतिभावान खेळाडूच करू शकतो, असेही मॅक्सवेलने सांगितले.