क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघ विदेशात गेला की कायम काहीसा दडपणाखाली असल्याचे अनेक वर्ष पाहायला मिळाले आहे. स्लेजिंगचे नाव घेतल्यावर तर भारतीय संघाचे नाव यात फार क्वचितच ऐकायला मिळते. मैदानात आणि मैदानाबाहेर अर्वाच्य भाषेत टीका करणे आणि प्रतिस्पर्धी संघाला चिथवणे यात ऑस्ट्रेलियाचा संघ हा कायम पुढे असतो. पण भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मात्र याच्या उलट चित्र पाहायला मिळत आहे.

भारताने पहिला कसोटी सामना ३१ धावांनी जिंकला. या सामन्यात कोहलीने केलेले सेलिब्रेशन आणि ऋषभ पंत याचं स्टंपमागून केलेलं स्लेजिंग हे मुद्दे चर्चेत राहिले. पहिल्या डावात ऋषभ पंतने उस्मान ख्वाजा याला ‘सगळेच पुजारा नसतात’ सहा शब्दात हिणवलं होतं. त्यानंतर आता सामन्याच्या शेवटच्या दिवशी त्याने पॅट कमिन्सचीही खोडी काढली. पॅट कमिन्स कर्णधार टीम याला साथ देत अतिशय संयमी खेळी करत होता. त्यावेळी ‘पॅट, सोपे चेंडू तरी मारत जा.. इथे फलंदाजी करणं कठीण आहे’, अशा शब्दात तो सारखा पॅट कमिन्सला मोठा फटका खेळण्यासाठी चिथवत होता.

या संदर्भातील व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून त्यावर नेटिझन्सने भन्नाट कमेंट दिल्या आहेत.