यष्टीमागून गोलंदाजांना सल्ले देणारे अनेक यष्टीरक्षक-कर्णधार असतात. कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजाची एकाग्रता भंग करण्यासाठी ही युक्ती सर्रास वापरली जाते. तसेच हे यष्टीरक्षक वेळ प्रसंगी फलंदाजाला देखील डिवचण्याचा प्रयत्न करत असतात. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सुरू असलेल्या कसोटी मालिकेत असाच एक प्रयत्न पाहायला मिळाला. यष्टींमागून टीम पेनने रोहित शर्माला डिवचले. पण त्यावर रोहितने पेनला भन्नाट उत्तर दिले.

मेलबर्न येथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पेन याने रोहितला डिवचले. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रोहित शर्मा फलंदाजी करत असताना पेनने यष्टींमागून ‘मुंबई इंडियन्स’मध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आणि सर्वत्र हशा पिकला. तसेच, रोहितने जर पुढच्या चेंडूवर षटकार लगावला, तर मी ‘मुंबई इंडियन्स’ला पाठिंबा देणार असेही तो म्हणाला. हे सारं जम बसलेल्या रोहित शर्माची एकाग्रता भंग करण्यासाठी पेनने अशी टिपण्णी केल्याची चर्चा होती.

 

याबाबत रोहितला विचारले असता रोहितने भन्नाट उत्तर दिले. तो म्हणाला की मी त्याच्या स्लेजिंगकडे तितकंसं लक्ष देत नव्हतो. कारण मला माझ्या खेळीवर लक्ष केंद्रित करणं जास्त गरजेचं वाटलं. पण जर तो तसं म्हणत असेल तर त्याने शतक ठोकून दाखवावे. त्याने तसे केल्यास मी स्वतः ‘मुंबई इंडियन्स’च्या मालकांशी (अंबानी) बोलतो, असे तो म्हणाला.