चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०० धावांवर संपवला. कुलदीप यादवने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कसोटी सामन्यात एकाच डावात ५ बळी टिपण्याची किमया केली. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने दुसऱ्यांदा तर भारताबाहेर पहिल्यांदाच ही कामगिरी केली. त्यामुळे सर्व स्तरातून त्याचे कौतुक झाले. महान फिरकीपटू शेन वॉर्न कुलदीपची कामगिरी पाहून खुश झाला आणि त्याने खास ट्विट करून त्याची स्तुती केली.
पहिल्या डावात कुलदीपने उत्तम गोलंदाजी केली. त्याच्याच कामगिरीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात ३२२ धावांची आघाडी घेतली आणि यजमान संघावर फॉलो-ऑनची नामुष्की ओढवली. तिसऱ्या दिवसाच्या खेळात ऑस्ट्रेलियाने एकूण ६ गडी गमावले. त्यापैकी उस्मान ख्वाजा (२७), ट्रेव्हिस हेड (२०) आणि कर्णधार टीम पेन (५) हे ३ गडी कुलदीपने टिपले. त्यानंतर चौथ्या दिवसाच्या खेळात त्याने आधी लॉयनला शून्यावर तंबूत धाडले. शेवटच्या जोडीने चांगली झुंज देत ४२ धावांची भागीदारी केली. अखेर कुलदीपनेच ती जोडी फोडत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०० वर संपवला.
याबाबत शेन वॉर्न याने ट्विट केले की मित्रा, तू उत्तम गोलंदाजी केलीस. एका डावात ५ बळी टिपल्याबद्दल तुझे अभिनंदन! तुझ्या यशाचे श्रेय तुला मला दिलंस त्याबद्दल मी तुझा ऋणी आहे. तुझ्याबरोबर क्रिकेट नेट्समध्ये वेळ घालवताना आणि तुला खेळताना पाहून खरंच खूप आनंद होतो.
Well bowled & congrats on your 5 wicket haul @imkuldeep18 also, thankyou for your very kind words – it’s been a pleasure to work with you & watch you bowl my friend ! pic.twitter.com/35vNtL8qp5
— Shane Warne (@ShaneWarne) January 6, 2019
यावर कुलदीप यादवने देखील नम्रपणे त्याचे आभार मानले. तुमच्याकडून स्तुती ऐकणे हे माझ्यासाठी खूप खास आहे. तुम्ही दिलेल्या प्रशिक्षणामुळेच मी आज ही कामगिरी करू शकलो. मला असेच तुमचे मार्गदर्शन लाभत राहो, असे त्याने ट्विट केले.
Means the most coming from you boss!
Learning from you has made my job easier
Looking forward to all the advise and guidance in the days to come!Kuldeep yadav (@imkuldeep18) January 6, 2019
दरम्यान, कुलदीपने या पाच बळींच्या कामगिरीसह एक विक्रम नावावर केला. ऑस्ट्रेलियात पाहुण्या संघातील डावखुऱ्या मनगटी फिरकीपटूने (चायनामन गोलंदाज) डावात ५ बळी टिपणारा तो दुसरा गोलंदाज ठरला. या आधी इंग्लंडच्या जॉनी वॉर्डल याने १९५५ साली सिडनीच्या मैदानावरच ७९ धावा खर्चून ५ बळी टिपले होते. त्यानंतर ६४ वर्षांनी आज कुलदीपने ९९ धावांत ५ गडी बाद केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 6, 2019 5:09 pm