ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत स्टीव्ह स्मिथचा एक व्हिडीओ व्हायरल झालेला दिसला. विरेंद्र सेहवागसह काही लोकांनी व्हिडीओ ट्विट करत स्टीव्ह स्थिमवर टीका केली. पंत आणि पुजारा ड्रिंक्स ब्रेकमध्ये पाणी पिण्यासाठी खेळपट्टीवरून बाजूला गेले. त्यावेळी स्मिथने क्रीजजवळ जाऊन पंतने फलंदाजीसाठी केलेल्या खुणा पायाने पुसून टाकल्या. या घटनेनंतर सर्व स्तरातून त्याच्यावर टीका झाली. स्मिथनेदेखील त्या कृतीमागचा हेतू वेगळा असल्याचं सांगितलं. यानंतर आता स्मिथच्या बचावासाठी थेट प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी वादात उडी घेतली.

पाहा तो व्हायरल व्हीडीओ-

“स्मिथवर होणारे आरोप हे हास्यास्पद आहेत. अशाप्रकारचे आरोप स्मिथवर होत आहेत ही बाब अतिशय वाईट आहे. ज्यांना कोणालाही वाटत असेल की तो करत असलेल्या कृतीच्या मागे नकारात्मक हेतू होता, ते लोक खूपच चुकीचा विचार करत आहेत. कसोटीच्या पाचव्या दिवशी खेळपट्टी अतिशय सपाट आणि टणक झाली होती. खेळपट्टी खराब करण्याचा विचार जरी करायचा असेल तरी त्यासाठी किमान १५ इंचाचे स्पाईक्सचे शूज घालणं आवश्यक होते. आणि महत्त्वाचं म्हणजे, स्मिथ क्रीजच्या जवळपासही फिरकला नव्हता”, असं स्पष्टीकरण देत लँगर यांनी स्मिथची पाठराखण केली.

आणखी वाचा- IND vs AUS: चौथ्या कसोटीआधी ऑस्ट्रेलियाला धक्का; महत्त्वाच्या फलंदाजाची माघार

प्रकरणावर स्मिथने काय दिलं उत्तर?

स्टीव्ह स्मिथ यानेही आरोपानंतर आपली बाजू मांडली. “माझ्यावर अशाप्रकारचे आरोप झाले आहेत हे ऐकून मला खूप वाईट वाटलं. माझ्यासाठी हा प्रकार धक्कादायक होता. मी जी कृती केली त्यात काहीही चुकीचा हेतू नव्हता. फलंदाजाच्या जागी उभा राहून आम्ही असा अंदाज घेत असतो की गोलंदाजी करणारा कशापद्धतीने गोलंदाजी करतोय. फलंदाज काय विचार करत असेल. या साऱ्या विचारचक्रानंतर मी फलंदाज असल्याप्रमाणे पायाने तेथील जमिनीवर मार्किंग करायला गेलो. पण माझ्या कृतीचा चुकीचा अर्थ घेतला गेला”, असं स्मिथने स्पष्टीकरण दिलं.