News Flash

भारतीय संघाने संयमी खेळीतून द्रविडला दिलं अविस्मरणीय बर्थडे गिफ्ट; आज ‘हे’ तीन खेळाडू ठरले ‘द वॉल’

आज द्रविडचा वाढदिवस असून सामना ड्रॉ झाल्यानंतर आयसीसीनेही केलं खास ट्विट

(फोटो सौजन्य ट्विटरवरुन साभार)

भारतीय क्रिकेट संघाने सिडनी कसोटीमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवलं आहे. ४०७ धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघावर संपूर्ण दिवस ऑस्ट्रेलियन गोलंदाजीसमोर टिकून राहण्याचं मोठं आव्हान होतं. सोमवारी खेळ सुरु झाला तेव्हा भारताचा विजय तर लांबच राहिला सामना गमावण्याचीही शक्यता व्यक्त केली जात होती. मैदानात कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराची जोडी फलंदाजीसाठी आली. मात्र भारतीय चाहत्यांना सिडनी कसोटीच्या दिवशी राहून राहून राहुल द्रविडची आठवण येत होती. भारतीय संघातील एखाद्या खेळाडूने द वॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्रविडप्रमाणे संयमी आणि शांत खेळी करुन ही पराभवाची टांगती तलवार डोक्यावरुन उतरवावी अशी सर्वच भारतीयांची इच्छा होती. भारतीय चाहत्यांनी व्यक्त केलेली इच्छा आणि संघाने दाखवलेली चिकाटी यामुळे सामना वाचवण्याचं हे स्वप्न प्रत्यक्षात अवतरलं. एक दोन नाही तर भारतीय संघातील तीन खेळाडूंनी द्रविडची आठवण येईल असा संयमी खेळ करत सामानातील पराभव टाळला आणि ऑस्ट्रेलिया सहज वाटणारा विजय हा त्यांना मिळूच दिला नाही. आपल्या खेळातून समोर दिसणारा भारताचा पराभव दूर लोटणाऱ्या या तिन्ही खेळाडूंनी आपल्या संयमी खेळातून भारताच्या माजी खेळाडूला त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा ड्रॉ झालेला सामना जणू काही गिफ्ट म्हणूनच दिला.

ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ४०७ धावांचे आव्हान ठेवलं होतं. भारताने या धावसंख्येचा पाठलाग करताना चौथ्या दिवसाअखेर दोन गड्यांच्या मोबदल्यात ९८ धावांपर्यंत मजल मारली होती. सामन्याचा पाचवा दिवस हा आजचा दिवस योगायोगाने द्रविडचा वाढदिवशीच होता. भारतीय चाहत्यांच्या नजरा चेतेश्वर पुजाराकडे लागल्या होत्या. पुजारानेही भारतीय चाहत्यांना निराश केलं नाही. द्रविडचा वारसदार म्हणून ज्या चेतेश्वरकडे पाहिले जाते त्याने दुसऱ्या डावामध्ये २०५ चेंडूंमध्ये ७७ धावांची संयमी खेळी केली. पुजाराने या खेळीमधून पहिल्या डावातील खेळानंतर त्याला ट्रोल करणाऱ्यांना बॅटच्या सहाय्यानेच उत्तर दिलं अशी चर्चाही सोशल मीडियावर रंगली.

चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर भारताच्या हनुमा विहारी आणि रविचंद्रन अश्विन हे दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियन संघ आणि विजयाच्यामध्ये भिंत म्हणून उभे राहिले. द्रविडला साजेसा खेळ कोण करतं अशी जणूकाही स्पर्धाच या दोघांमध्ये सुरु होती. अश्विनने १२८ चेंडूंमध्ये ३९ धावांची खेळी केली. अश्विन दरवेळेस ज्या नाथन लॉयनच्या गोलंदाजीवर गोंधळतो त्याची गोलंदाजीही चांगल्या पद्धतीने खेळून काढली. हुनमा विहारी जखमी असल्याने त्याला धावा काढण्यासाठी फारसं पळता येणार नव्हतं. मात्र संघाचा पराभव होऊ नये म्हणून हनुमाने आपल्या केवळ बचावात्मक खेळाच्या जोरावर भारताला पराभवापासून वाचवलं.

हनुमा विहारीने १६१ चेंडूंमध्ये केवळ दोन फटके मारले. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार अॅलन बॉर्डर यांना आणखीन एखाद्या खेळाडूला चांगले फटके मारता येत नाही असं वाटलं असावं. बॉर्डर यांनी पहिल्या डावानंतर पुजाराला चांगले फटके मारता येत नाही असं मत व्यक्त केलं होतं. बॉर्डर यांनी आपल्या या मतप्रदर्शनाच्या माध्यमातून भारतीय फलंदाजांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय फलंदाजांनी त्याकडे फारसं लक्ष न देताना सामना वाचवण्यासाठी प्रयत्न केला आणि फटकेबाजी न करता डॉट बॉल खेळून सामना अनिर्णित ठेवण्यात यश मिळवलं. विशेष म्हणजे भारतीय संघाच्या फलंदाजीची फार पडझड होऊ न देता यजमानांच्या तोंडचा विजयाचा घास हिरवून घेण्याची ही किमया संघाने द्रविडच्या वाढदिवसाच्या दिवशीच केली. याच माध्यमातून रहाणेच्या संघाने द्रविडला बर्थ डे गिफ्ट दिल्याचं ट्विट आयसीसीनेही केलं आहे.

चार सामन्यांच्या मालिकेमध्ये दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकला असून आजच्या सामना अनिर्णित राहिल्याने चौथ्या कसोटीच्या निकालानंतरच मालिका कोण जिंकणार हे निश्चित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2021 5:42 pm

Web Title: ind vs aus sydney test draw is a fitting birthday gift for rahul dravid scsg 91
Next Stories
1 अश्विनने ऋषभ पंतच्या तडाखेबंद खेळीचे कौतुक केले पण….
2 IND vs AUS: भारत ४-० ने हारणार अशी भविष्यवाणी करणारा क्रिकेटपटू आता म्हणतो…
3 WTC : भारत-न्यूझीलंडमध्ये ‘कांटे की टक्कर’, ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर
Just Now!
X