विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला २७ नोव्हेंबरमध्ये सुरूवात होणार आहे. १० नोव्हेंबरला IPL Final झाल्यानंतर १४ नोव्हेंबपर्यंत भारताचे खेळाडू ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहेत. या दौऱ्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध ३ एकदिवसीय, ४ कसोटी आणि तीन टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी उपकर्णधार रोहित शर्माला संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्याच्या जागी एकदिवसीय आणि टी२० मालिकेत लोकेश राहुलला उपकर्णधारपद देण्यात आलं आहे. लोकेश राहुलला निर्धारित षटकांच्या संघात स्थान मिळणं अपेक्षित होतं पण कसोची संघात त्याला स्थान मिळाल्यानंतर माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

लोकेश राहुलचा कसोटीतील खराब फॉर्म पाहता त्याला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या कसोटी मालिकेत स्थान देण्यात आलेले नव्हते. जानेवारी २०२०मध्ये झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यातही त्याला टी२० आणि वन डे संघात जागा मिळाली होती, पण कसोटी संघात त्याचा समावेश करण्यात आलेला नव्हता.

IPLमध्ये राहुलने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर त्याला कसोटी संघात स्थान देण्यात आले. यावर संजय मांजरेकर यांनी ट्विट करत निवड समितीवर टीका केली आहे. “IPLच्या कामगिरीच्या आधारावर एखाद्या खेळाडूला कसोटी संघात स्थान देऊन निवड समिती चुकीचा पायंडा पाडत आहे. विशेषत: ज्या खेळाडूची कसोटी कारकीर्द फारशी चांगली राहिलेली नाही, अशा खेळाडूला संधी देणं चुकीचं आहे. अशा प्रकारच्या निवडीमुळे रणजीमध्ये चांगली कामगिरी करणारी नवीन पिढी नाउमेद होण्याची शक्यता अधिक आहे”, असे ट्विट मांजरेकर यांनी केले.

दरम्यान, राहुलने IPL 2020मध्ये आतापर्यंत १२ सामन्यात ५९५ धावा केल्या आहेत. सध्या तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असून ऑरेंज कॅपचा मानकरी आहे.