विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला २७ नोव्हेंबरमध्ये सुरूवात होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध ३ एकदिवसीय, ४ कसोटी आणि तीन टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. १० नोव्हेंबरला IPL Final झाल्यानंतर १४ नोव्हेंबपर्यंत भारताचे खेळाडू ऑस्ट्रेलियात दाखल होणार आहेत. तर काही सहाय्यक कर्मचारी थेट भारतातून ऑस्ट्रेलियामध्ये दाखल होणार आहे. अशातच भारतीय संघ व्यवस्थानातील एका सदस्याला करोना झाल्याची माहिती मुंबई मिररने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

IPLचे साखळी फेरीचे सामने लवकरच संपतील. त्यानंतर ५ नोव्हेंबरपासून प्ले-ऑफ्सच्या सामन्यांना सुरूवात होणार आहे. भारतीय संघातील खेळाडू दुबईहूनच ऑस्ट्रेलिया रवाना होणार असल्याने सध्या IPL खेळत नसलेले खेळाडू, BCCIचे काही कर्मचारी आणि सदस्य युएईत दाखल होणार आहेत आणि तेथूनच संपूर्ण संघ सहाय्यक कर्मचारी वर्गासह ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. भारतात असलेल्या खेळाडूंची आणि सहाय्यक वर्गाची युएईला जाण्यापूर्वी BCCIकडून करोना चाचणी घेण्यात आली. त्यात संघाचे थ्रोडाऊन स्पेशालिस्ट डी रघुवेंद्र हे करोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळले.

सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, रघुवेंद्र हे रविवारी युएईसाठी रवाना होणार होते. परंतु त्यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता त्यांनी दुबईवारी रद्द झाली आहे. इतकेच नव्हे तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही ते जाणार नसल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.