भारताविरूद्धच्या चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ३६९ धावांपर्यंत मजल मारली. मार्नस लाबूशेनचे केलेले दमदार शतक (१०८) आणि कर्णधार टीम पेनची अर्धशतकी खेळी याच्या जोरावर यजमानांनी साडेतीनशेपार मजल मारली. कॅमेरॉन ग्रीन (४७) आणि मॅथ्यू वेड (४५) यांनीही चांगली खेळी केली. भारतीय संघाकडून कसोटी पदार्पण करणाऱ्या दोन गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनी प्रत्येकी ३ बळी टिपले. शार्दूल ठाकूरनेदेखील ३ बळी टिपले. तर मोहम्मद सिराजला एक गडी बाद करता आला.
भारतीय संघातून पदार्पणाच्या कसोटीत दोन गोलंदाजांनी एकाच डावात ३-३ बळी घेण्याची ही दुसरीच वेळ ठरली. नटराजनने मॅथ्यू वेड, मार्नस लाबूशेन आणि जोश हेजलवूडला माघारी पाठवलं. तर वॉशिंग्टन सुंदरने स्टीव्ह स्मिथ, कॅमेरॉन ग्रीन आणि नॅथन लायन या तिघांना तंबूचा रस्ता दाखवला. एकाच डावात दोन नवोदितांनी ३-३ बळी टिपण्याचा योगायोग भारताच्या बाबतीत तब्बल ७१ वर्षांनी घडला. याआधी १९४८-४९च्या हंगामात वेस्ट इंडिजविरूद्ध भारतीय संघाने ही किमया साधली होती.
Two debutants with 3-wicket hauls in the same Test innings for India:
vs West Indies (1st inns) in Kolkata, 1948-49
vs Australia (1st inns) in Brisbane, 2021#AUSvIND— Sampath Bandarupalli (@SampathStats) January 16, 2021
असा रंगला ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर एका धावेवर तर मार्कस हॅरिस ५ धावांवर माघारी परतला. स्मिथदेखील ३६ धावांवर बाद झाला. मॅथ्यू वेड आणि लाबूशेन यांच्यात शतकी भागीदारी झाली, पण वेडला अर्धशतक (४५) करता आले नाही. मार्नस लाबूशेनने मात्र ९ चौकारांसह दमदार शतक झळकावलं. तो १०८ धावांवर झेलबाद झाल्यानंतर कर्णधार टीम पेन (२८) आणि कॅमेरॉन ग्रीन (३८) या जोडीने दिवसाचा खेळ संपेपर्यंत चांगला खेळ केला. दुसऱ्या दिवशी ग्रीन अर्धशतकानजीक (४७) असताना बाद झाला. तर कर्णधार पेन अर्धशतक (५०) करून लगेच माघारी परतला. त्यानंतर मिचेल स्टार्क (२०) आणि नॅथन लायन (२४) जोडीने थोडीशी झुंज दिली. पण त्यांचा डाव ३६९ धावांवर आटोपला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 16, 2021 9:39 am