भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वन-डे मालिका यजमान ऑस्ट्रेलियाने तर टी२० मालिका भारतीय संघाने जिंकली. आता १७ तारखेपासून या दोन संघांमध्ये कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा याने फिटनेस टेस्ट पास केली असली, तरी १४ दिवसांच्या विलगीकरणामुळे रोहित पहिल्या दोन कसोटी सामन्यांना मुकणार आहे. अशा परिस्थितीत मयंक अग्रवाल याच्यासोबत सलामीवीर म्हणून कोणत्या खेळाडूला संधी मिळावी याबाबत सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. पृथ्वी शॉ आणि शुबमन गिल असे दोन पर्याय टीम इंडियाकडे उपलब्ध आहेत. त्यापैकी माजी कर्णधार सुनील गावसकर आणि ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार अलन बॉर्डर यांनी एका खेळाडूची निवड केली आहे.

VIDEO: भरमैदानात राडा! बांगलादेशच्या मुश्फीकूरने फिल्डरवर उगारला हात अन्…

“पृथ्वी शॉ हा खूप प्रतिभावंत खेळाडू आहे पण त्याने त्याचा फलंदाजीचा दृष्टीकोन बदलायला हवा. खेळपट्टीवर जास्तीत जास्त काळ उभं राहणं त्याने शिकायला हवं. सलामीवीर म्हणून खेळपट्टी आणि गोलंदाजाला समजून घेण्यासाठी तुम्ही स्वत:ला वेळ द्यायला हवा. सध्या तो ज्याप्रकारची फलंदाजी करतो त्यावरून तो कामगिरीत सातत्य राखू शकेल असं वाटत नाही. तो अनेक डावांपैकी एखाद्या डावांत धावा करेल पण ते पुरेसं नाही. त्याला खेळपट्टीवर टिकून खेळणं शिकायला हवं. याउलट शुबमन गिल तंत्रशुद्ध सलामीवीर आहे”, असे गावसकर म्हणाले.

“पृथ्वी शॉ डावाच्या सुरूवातीलाच विचित्र फटके खेळण्याचा प्रयत्न करत असतो. गिल मात्र त्याच्या तंत्राच्या बाबतीत पक्का आहे. तो युवा फलंदाज आहे त्यामुळे तो इकडे-तिकडे फटकेबाजी करू शकतो हे मला मान्य आहे. पण तो तसं करत नाही. तो अतिशय गांभीर्याने फलंदाजी करताना दिसतो. त्यामुळे माझी त्याला पसंती असेल”, असं गावसकर यांनी स्पष्ट केलं.

याच मुद्द्यावर बोलताना अलन बॉर्डर म्हणाले, “भारतीय क्रिकेटप्रेमींना पृथ्वी शॉची फलंदाजी आणि त्याची स्टाईल आवडते हे मला माहिती आहे. पण तो प्रत्येक चेंडू फटकवायच्या उद्देशाने खेळतो. ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये नव्या चेंडूने खेळताना सपाट खेळपट्टीवरही चेंडू स्विंग होण्याची शक्यता असते. त्यामुळे फलंदाजाने अतिशय लक्षपूर्वक खेळ करणं आवश्यक असतं पण शॉ मात्र बेजबाबदार फटके खेळून स्वत:ची विकेट बहाल करतो. मी जर भारतीय संघाचा सिलेक्टर असतो तर मी गिलची संघात निवड केली असती. मयंकबरोबर तोच योग्य सलामीवीर आहे”, असं मत बॉर्डर यांनी व्यक्त केलं.