भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरी कसोटी पर्थच्या मैदानावर खेळत आहे. या कसोटीत नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी स्वीकारली. आपल्या कर्णधाराचा निर्णय सलामीवीरांनी सार्थ ठरवला आणि शतकी सलामी दिली. पण दुसरीकडे भारताचा कर्णधार विराट कोहली याने याच वर्षात खेळलेला एक ‘डाव’ पुन्हा एकदा खेळला आहे.

फिंच बाद झाला तो क्षण

भारतीय संघ दुसऱ्या कसोटी सामन्यात ४ वेगवान गोलंदाज घेऊन उतरला. भारताने अश्विनला संघातून वगळले आणि त्याच्या जागी उमेश यादवला संघात स्थान दिले. त्यामुळे भारताच्या संघात जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा असे ४ वेगवान गोलंदाज समाविष्ट करण्यात आले. याआधी जोहान्सबर्ग येथे झालेल्या कसोटीत भारतीय संघ ४ वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरला होता आणि भारताने सामना जिंकला होता.

जोहान्सबर्ग कसोटीत भारतीय संघात अष्टपैलू हार्दिक पांड्यासह एकूण ५ वेगवान गोलंदाज खेळवण्यात आले होते. भारताने ती मालिका गमावली होती, मात्र तो सामना भारताला जिंकता आला होता. हाच ‘डाव’ विराटने पुन्हा एकदा खेळला आहे. मात्र या रणनीतीचा टीम इंडियाला फायदा होणार का आणि विजयाचा ‘तो’ योगायोग जुळून येणार का? याकडे आता साऱ्यांचे लक्ष आहे.