करोना विषाणूच्या तडाख्यामुळे गेले दोन-अडीच महिने ठप्प झालेलं क्रिकेट आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलं आहे. कॅरेबियन बेटांवर विन्सी प्रिमीयर टी १० लीग स्पर्धा विनाप्रेक्षक सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर अनेक क्रिकेट मालिकांच्या तारखादेखील निश्चित केल्या गेल्या आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. पण टी २० विश्वचषक स्पर्धेबाबत अंतिम निर्णय झाल्यावरच भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याबाबत निश्चित सांगता येईल, असे BCCI कडून सांगण्यात आले आहे.

या दौऱ्यावर बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिका ३ डिसेंबर ते ७ जानेवारी या काळात रंगणार आहे. त्यातील दुसरी कसोटी ही दिवस-रात्र पद्धतीची असणार असून ११ ते १५ डिसेंबर दरम्यान अ‍ॅडलेड-ओव्हल मैदानावर हा सामना खेळवण्यात येणार आहे. दिवस-रात्र कसोटीसाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ उत्सुक आहेत. याच दरम्यान ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ याने दिवस-रात्र कसोटीत भारतापेक्षा ऑस्ट्रेलियाचा संघ सरस ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

“भारतापेक्षा आम्ही गुलाबी चेंडूने दिवस-रात्र कसोटी अधिक खेळलो आहोत. त्याचा आमच्या संघाला उपयोग होईल. भारतीय संघाने कोलकातामध्ये दिवस-रात्र कसोटीत दमदार कामगिरी करून दाखवली. गुलाबी चेंडूने दिवस-रात्र कसोटी क्रिकेट सामना थोडं अवघड असतं, पण भारतीय संघाकडे असे फलंदाज आणि गोलंदाज आहेत, ज्यांना कठीण प्रसंगात संघाला कसं वर आणायचं हे नीट माहिती आहे. टीम इंडियातील खेळाडू हे जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत. ते कोणत्याही गोष्टी पटकन आत्मसात करू शकतात, म्हणूनच भारत-ऑस्ट्रेलिया दिवस-रात्र सामना खूप रोमांचक होणार, अशी खात्री स्मिथने दिली.