4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने कांगारुंवर 2-1 ने मात करत मालिका आपल्या खिशात घातली. भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियन भूमीतला हा पहिलाच कसोटी मालिका विजय ठरला आहे. विराट कोहलीच्या भारतीय संघाने ऐतिहासीक कामगिरी करत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत हरवू शकलो हे कर्णधार म्हणून माझं सर्वात मोठं यश असल्याचं मत विराटने व्यक्त केलं आहे. सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहली बोलत होता.

अवश्य वाचा – IND vs AUS : विराट भारताचा सर्वोत्तम कर्णधार होऊ शकतो – सुनिल गावसकर

“मला याआधी माझ्या संघाचा इतका अभिमान कधीच वाटला नव्हता. आमची सुरुवात अतिशय योग्य झाली. तुमच्या संघात असे तरुण आणि उत्साही साथीदार असतील तर कर्णधार म्हणून तुम्हालाही मजा येते. आतापर्यंत माझ्या आयुष्यातलं हे सर्वात मोठं यश आहे. या मालिका विजयामुळे आमच्या संघाला एक वेगळी ओळख मिळणार आहे.” विराटने आपल्या संघाचं कौतुक केलं.

अवश्य वाचा – IND vs AUS : कांगारुंना गुडघे टेकवायला लावण्यात चेतेश्वर पुजारा यशस्वी – इयन चॅपल

भारतीय गोलंदाजांसाठी ही मालिका अतिशय चांगली गेली. प्रत्येक सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संपूर्ण संघाला माघारी धाडण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी ठरले. फलंदाजीत चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले. विराटने त्यांचंही मनापासून कौतुक केलं. कसोटी मालिकेत विजय मिळवल्यानंतर भारत ऑस्ट्रेलियाविरोधात 3 वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.

अवश्य वाचा – भारताची तपश्चर्या फळाला, कांगारुंच्या भूमीत भारताने कसोटी मालिका जिंकली