अॅडलेड कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ३१ धावांनी मात करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारतीय गोलंदाजांनी दोन्ही डावांमध्ये चांगली गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या संघाला ऑलआऊट केलं. फलंदाजीमध्ये चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे यांनी आपली चमक दाखवली. परदेशी खेळपट्ट्यांवर नेहमी गटांगळ्या खाणाऱ्या भारतीय संघाने या सामन्यात आश्वासक खेळ करत यापुढचे सामने हे तितकेच रंगतदार होतील हे दाखवून दिले. १४ डिसेंबरपासून पर्थच्या मैदानावर या मालिकेतला दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. दरम्यान आजच्या सामन्यात भारतीय संघाने ६ विक्रमांची नोंद केली.

  • एका कसोटी सामन्यात यष्टींमागे ११ झेल पकडत ऋषभ पंतने महेंद्रसिंह धोनी आणि वृद्धीमान साहा यांच्या सर्वाधिक झेलांच्या विक्रमाला मागे टाकलं. धोनी आणि साहा यांच्या नावावर अनुक्रमे ९ व १० झेल जमा आहेत. याचसोबत पंतने एबी डिव्हिलियर्स आणि जॅक रसेल यांच्या ११ झेलांच्या विक्रमाशीही बरोबरी केली.
  • ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेत पहिला सामना जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
  • इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामना जिंकणारा विराट कोहली पहिला आशियाई कर्णधार ठरला आहे. याआधी राहुल द्रविड आणि महेंद्रसिंह धोनी यांनी इंग्लंड व दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामना जिंकला आहे, मात्र ऑस्ट्रेलियामध्ये दोघांनाही अपयश आलं होतं.
  • एका कॅलेंडर वर्षांमध्ये परदेशी खेळपट्ट्यांवर ३ कसोटी सामने जिंकण्याची भारतीय संघाची ही दुसरी वेळ ठरली. याआधी १९६८ साली भारतीय संघाने पहिल्यांदा अशी कामगिरी केली होती.
  • २००३ साली झालेल्या अॅडलेड कसोटीत राहुल द्रविडने द्विशतकी खेळी करुन भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. या कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा किताब देण्यात आला होता. यानंतर आज १५ वर्षांनी चेतेश्वर पुजाराने याच मैदानावर पहिल्या डावात शतकी तर दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी करत सामनावीराचा किताब पटकावला.
  • ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेत पहिला सामना जिंकणारा भारत दुसरा आशियाई देश ठरला आहे. याआधी १९७८-७९ साली पाकिस्तान संघाने मेलबर्न कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता.