तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ३३८ धावा केल्यानंतर भारतीय संघानेही चांगली झुंज देत २४४ धावा केल्या. शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांनी अर्धशतकी खेळी करत संघाला चांगला पाया रचून दिला. मधल्या फळीतील फलंदाजांनी भारतीय चाहत्यांची निराशा केली, पण तळाच्या फलंदाजांना हाताशी घेत रविंद्र जाडेजाने काही काळ झुंज दिली. जाडेजाने संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली पण तरीही संघ ९४ धावांनी पिछाडीवरच राहिला. भारताच्या पहिल्या डावात तब्बल १२ वर्षांनी एक दुर्दैवी योगायोग जुळून आला.

ऑस्ट्रेलियन संघाच्या डावाचा शेवट रन आऊटने झाला. स्टीव्ह स्मिथला जाडेजाने थ्रो मारून बाद केलं. त्यानंतर भारतीय संघातदेखील तीन खेळाडू रन आऊट म्हणजेच धावचीत झाले. आधी हनुमा विहारी, त्यानंतर आर अश्विन आणि पाठोपाठ जसप्रीत बुमराह असे तीन फलंदाज भारताच्या डावात धावचीत झाले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एकाच डावात भारताचे तीन खेळाडू धावचीत होण्याचा दुर्दैवी योगायोग तब्बल १२ वर्षांनी जुळून आला. याआधी २००८ साली मोहालीच्या मैदानावर तीन भारतीय फलंदाज एकाच डावात धावचीत झाले होते.

दरम्यान, पहिल्या डावात भारताने चांगली सुरूवात केली होती. पण ७० धावांची सलामी दिल्यानंतर रोहित (२६) माघारी परतला. शुबमन गिलने अर्धशतक ठोकलं पण नंतर तोदेखील लगेच माघारी परतला. तिसऱ्या दिवसाच्या खेळात अजिंक्य रहाणे (२२), हनुमा विहारी (४), ऋषभ पंत (३६), अश्विन, सैनी आणि बुमराह यांना फार काळ खेळपट्टी सांभाळता आली नाही. पुजाराने संयमी अर्धशतक केलं. तर जाडेजाने नाबाद २८ धावा काढत संघाला अडीचशे धावांच्या जवळ नेले.