भारतीय संघ ६ डिसेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या कसोटी मालिकेत स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर महत्वाचे खेळाडू नसल्याने ऑस्ट्रेलियापेक्षा भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे. पण तसे असले तरीही ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजा हा विराट कोहलीला आपल्या पराक्रमी कामगिरीने झाकून टाकेल, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याने केली आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग

 

उस्मान ख्वाजा हा प्रतिभावान फलंदाज आहे. त्याची ऑस्ट्रेलियातील कामगिरी अतिशय उल्लेखनीय आहे. भारतीय वेगवान गोलंदाज कितीही वेगाने किंवा चतुराईने गोलंदाजी करत असले, तरीही त्यांच्याविरुद्ध चांगला खेळ करण्याची क्षमता उस्मानमध्ये आहे. त्याने बड्या गोलंदाजांची धुलाई केली आहे. त्यामुळे तो सर्वोत्तम कामगिरी करून मालिकेत सर्वाधिक धावा करेल आणि मालिकावीराचा ‘किताब पटकावेल, अशी भविष्यवाणी पॉन्टिंग याने केली आहे.

गेल्या ४० वर्षांचा इतिहास पाहता भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या उसळत्या खेळपट्ट्यांवर चांगला खेळ करू शकलेला नाही. त्यांना येथे एकही मालिका जिंकता आलेली नाही. उसळत्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाज चांगली कामगिरी करतील असे मला वाटत नाही. त्यामुळे आता हा संघ कशा पद्धतीने खेळतो हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे, असे तो म्हणाला.