भारत-ऑस्ट्रेलिया ५ एकदिवसीय सामन्यांची मालिका शनिवारपासून सुरु होणार आहे. मात्र भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढलेल्या तणावामुळे या मालिकेतील २ सामन्यांचे ठिकाण बदलण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पाकिस्तानने बुधावरी (ता. २७) सकाळी भारताच्या हद्दीत लढाऊ विमान घुसवून बॉम्ब टाकल्यानंतर प्रवासी विमान वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली होती. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या अखेरच्या दोन एकदिवसीय सामन्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या मालिकेतील शेवटचे २ सामने मोहाली आणि दिल्ली येथे होणार आहेत. मात्र ही २ ठिकाणे भारत-पाक सीमेच्या अगदी जवळ आहेत. पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. तसेच आम्ही आमच्या पसंतीच्या ठिकाणी आणि वेळी भारताला प्रत्युत्तर देऊ, असे पाकिस्तानने सांगितले आहे. तसेच पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चंदीगड येथील विमानतळ बंद करण्यात आले होते. त्यामुळेच मोहाली आणि दिल्ली येथे होणाऱ्या सामन्यावर सावट येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर अखेरचे दोन सामने मोहाली आणि दिल्ली येथून हलवण्याची शक्यता आहे. हे २ सामने सौराष्ट्र येथे होण्याची चर्चा सध्या तरी चर्चा आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान, सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने सामन्यांचे आयोजन करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यांनी BCCI ला ईमेलद्वारे स्टेडियमधील मैदान आणि खेळपट्टी पूर्णपणे तयार असल्याचे कळविले आहे.