भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीत तिसऱ्या दिवसाचा खेळ अपुऱ्या प्रकाशामुळे थांबवण्यात आला. दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ६ बाद २३६ धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियातर्फे सलामीवीर मार्कस हॅरिसने सर्वाधिक ७९ धावा केल्या. पण इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनदेखील केवळ ५ धावांवर तंबूत परतला. कुलदीप यादवने भन्नाट चेंडू टाकत त्याचा त्रिफळा उडवला.

पहिल्या सत्रावर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व होते, तर दुसरे सत्र भारताने गाजवले. त्यामुळे तिसरे सत्र कोणाचे ठरते याकडे साऱ्यांचे लक्ष होते. तशातच तिसऱ्या सत्रात कुलदीपने अप्रतिम चेंडू टाकला. कर्णधार टीम पेनला तो चेंडू समजलाच नाही आणि चेंडू बॅट आणि पॅडच्या मधून जाऊन यष्ट्यांवर आदळला.

दरम्यान, भारताने पहिला डाव ७ बाद ६२२ धावांवर घोषित केला. त्यानंतर सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि मार्कस हॅरिस या जोडीने सावध सुरुवात करत संघाला ५० धावांचा टप्पा ओलांडून दिला. पण त्यानंतर उस्मान ख्वाजा (२७) बाद झाला. दुसऱ्या सत्रात खेळपट्टीवर स्थिरावलेला हॅरिसदेखील बाद झाला. त्याने ७९ धावा केल्या. पाठोपाठ शॉन मार्श ८ धावांवर बाद झाला. चांगली सुरूवात मिळालेला लॅबसचेंज ३८ धावा करून माघारी परतला. नंतर ट्रेव्हिस हेड २० धावा करून बाद झाला. तर तिसऱ्या सत्रात पहिल्याच षटकात कर्णधार टीम पेन (५) तंबूत परतला. कुलदीप यादवने सर्वाधिक ३ बळी घेतले. सध्या हँड्सकॉम्ब २८ आणि कमिन्स २५ धावांवर नाबाद आहे.