भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून विजय मिळवला. शेवटच्या षटकात ७ धावा हव्या असताना महेंद्रसिंग धोनीने पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला आणि दुसऱ्या चेंडूवर एक धाव विजयाची औपचारिकता पूर्ण केली. या विजयामुळे भारताने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या सामन्यात महेंद्रसिंग धोनीने अर्धशतकी खेळी करून आपली उपयुक्तता दाखवून दिली. पण कायम शांत असणारा धोनी सामन्यात एका वेळेला थोडासा रागात असल्याचे दिसून आले.

विराट कोहली १०४ धावांची झंझावाती खेळी करून बाद झाला. त्यानंतर धोनी आणि कार्तिक हे दोघे जण मैदानावर होते. या दोघांनी फटकेबाजी करून आणि दुहेरी-तिहेरी धावा घेत भारताला विजयासमीप नेले. यावेळी थकलेल्या धोनी आणि कार्तिकसाठी मैदानाबाहेर असलेले खेळाडू खलील अहमद आणि युझवेन्द्र चहल हे पाणी घेऊन दोन षटकांच्या दरम्यान आले. त्यावेळी खलील अहमद खेळपट्टीवरून चालताना दिसला. ते पाहून धोनी चांगलाच संतापला आणि त्याला खेळपट्टीवरून बाजूला होण्यास सांगितले.

यावेळी धोनीने अपशब्द उच्चरल्याचेही म्हटले जात आहे. दरम्यान, संथ खेळीमुळे धोनीवर पहिल्या सामन्यात टीका करण्यात आली होती. पण दुसऱ्या सामन्यात खेळ सुधारून त्याने टीकाकारांना गप्प केले आहे.