भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. नागपूरच्या दुसऱ्या सामन्यात शतक झळकावलेल्या विराटने रांचीमध्येही शतकी खेळीची नोंद केली आहे. वन-डे कारकिर्दीतलं हे 41 वं शतक ठरलं आहे. या खेळीदरम्यान विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका भीम पराक्रमाची नोंद केली आहे. 2017 सालापासून विराटने वन-डे क्रिकेटमध्ये 15 शतकं झळकावली आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे कोणत्याही प्रतिस्पर्धी संघाला सर्व खेळाडूंची मिळून, विराटएवढी शतकं झळकावता आलेली नाहीयेत. केवळ दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 2017 पासून आतापर्यंत 15 शतकं झळकावली आहेत.

याचसोबत 2017 पासून आतापर्यंत विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25 शतकं झळकावली आहेत. पाकिस्तानच्या खेळाडूंना या काळात 24 शतकं झळकावता आली आहेत. यावरुन विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्मात असल्याचं कळून येतंय.

अवश्य वाचा – वन-डे क्रिकेटमध्ये विराट, सचिन आणि लारापेक्षा सर्वोत्तम खेळाडू – मायकल वॉर्न

पहिल्या दोन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियावर मात करणाऱ्या भारतीय संघाला तिसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात विराटचा अपवाद वगळता भारताचा एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरु शकला नाही. विराटने एकाकी झुंज देत भारताला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचे प्रयत्न तोकडेच पडले. 32 धावांनी भारतावर मात करत ऑस्ट्रेलियाने आपली पिछाडी 2-1 ने कमी केली. या मालिकेतला चौथा सामना मोहालीच्या मैदानावर होणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : कोहलीची गाडी सुसाट ! सचिनला मागे टाकत आणखी एक विक्रम केला नावावर