भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने वन-डे क्रिकेटच्या इतिहासात विक्रमी कामगिरीची नोंद केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वन-डे सामन्यादरम्यान विराट कोहलीने वन-डे क्रिकेटमध्ये १२ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. वन-डे क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद १२ हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्याचा विक्रम आता विराटच्या नावे जमा झाला आहे. याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावे जमा होता.

सचिनने आपल्या ३०९ व्या वन-डे सामन्यांत १२ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता. विराटने आपल्या कारकिर्दीतला २५१ वा सामना खेळत असताना हा मैलाचा दगड पार केला आहे. हा विक्रम आपल्या नावे करण्यासाठी विराटला फक्त २३ धावांची गरज होती. शुबमन गिलच्या साथीने त्याने या धावा करत दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत आपलं स्थान मिळवलं आहे. याआधी दुसऱ्या वन-डे सामन्यात विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २२ हजार धावांचा टप्पा पूर्ण करत सचिनचा विक्रम मोडला होता.

वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १२ हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारे फलंदाज –

१) विराट कोहली – २५१ सामने*

२) सचिन तेंडुलकर – ३०९ सामने

३) रिकी पाँटींग – ३२३ सामने

४) सनथ जयसूर्या – ३९० सामने

५) महेला जयवर्धने – ४२६ सामने

आणखी वाचा- २०२० मध्ये आता हेच बघायचं राहिलं होतं ! विराट कोहलीच्या बाबतीत घडून आला दुर्दैवी योगायोग

दरम्यान, तिसऱ्या वन-डे सामन्यात नाणेफेक जिंकत विराट कोहलीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आगामी टी-२० आणि कसोटी मालिका लक्षात घेता विराटने तिसऱ्या वन-डे सामन्यात महत्वाच्या खेळाडूंना विश्रांती दिली. शिखर धवनच्या साथीने शुबमन गिल सलामीला आला. परंतू आश्वासक सुरुवात केल्यानंतर धवन अबॉटच्या गोलंदाजीवर माघारी परतला.