वन-डे विश्वचषक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेला असताना भारतीय संघातल्या फलंदाजांच्या कामगिरीत सातत्य नसणं ही संघासाठी चिंतेची बाब ठरतेय. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या सामन्यातही भारताची फलंदाजी कोलमडली. मात्र विराट कोहलीने आपला धडाकेबाज फॉर्म कायम ठेवत कांगारुंना चांगली झुंज दिली आहे. रांचीच्या मैदानावर विराटने कर्णधार या नात्याने वन-डे क्रिकेटमध्ये 4 हजार धावांचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारा विराट 12 वा वन-डे कर्णधार ठरला आहे.

अवश्य वाचा – BCCI Annual Contract : ‘गब्बर’चं स्थान घसरलं, पंतला बढती

याचवेळी विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हीलियर्सलाही मागे टाकलं आहे. डिव्हीलियर्सने 77 डावांमध्ये अशी कामगिरी केली होती. तर विराटने कर्णधार या नात्याने आपल्या 63 व्या डावात ही कामगिरी केली आहे.

याच दरम्यान कोहलीने 2019 सालात वन-डे क्रिकेटमधे 500 धावांचा टप्पाही पार केला.

दरम्यान, पहिल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलियावर निर्विवाद वर्चस्व गाजवलेल्या भारताला तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून चांगलीच झुंज मिळाली. सलामीवीर उस्मान ख्वाजाचं शतक आणि कर्णधार अरोन फिंचचं धडाकेबाज अर्धशतक या जोरावर ऑस्ट्रेलियाने ५ गड्यांच्या मोबदल्यात ३१३ धावांपर्यंत मजल मारली. ख्वाजाने १०४ तर फिंचने ९३ धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेलनेही ४७ धावांची आक्रमक खेळी करत आपल्या संघाची धावसंख्या वाढवण्यात महत्वाची भूमिका बजावली. भारताचे गोलंदाज आज सपशेल अपयशी ठरले. अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर अंकुश लावण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी झाले.

अवश्य वाचा – IND vs AUS : कुलदीप यादवच्या प्रगतीचा आलेख चढताच, जाणून घ्या ही अनोखी कामगिरी

पहिल्या दोन सामन्यात बाजी मारुन भारताने ५ वन-डे सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. आगामी वन-डे विश्वचषकाआधी भारतीय संघाची ही अखेरची वन-डे मालिका असणार आहे. त्यामुळे या मालिकेत विजय प्राप्त करुन विश्वचषकात सकारात्मक वृत्तीने जाण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे.

अवश्य वाचा – Video : धोनीने फलंदाजीसाठी मैदानावर पाय ठेवताच दुमदुमलं रांचीचं मैदान