ऑस्ट्रेलियाचे माजी जलदगती गोलंदाज डेनिस लिली यांनी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याचं कौतुक केलं आहे. आपल्या काळात भल्याभल्या फलंदाजांची भंबेरी उडवण्यामध्ये माहीर असलेले लिली हे विराटच्या फलंदाजीने चांगलेच प्रभावित झाले आहेत.

अवश्य वाचा – IND vs AUS : तिसऱ्या कसोटीत हार्दिक पांड्याला संघात खेळवा !

“माझ्या मते विराट एक सर्वोत्तम खेळाडू, हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही कारण ही गोष्ट आता सर्वजण जाणून आहेत. त्याची फलंदाजीची शैली, खेळपट्टीवर टिकून राहण्याचा निग्रह, आणि प्रत्येक चेंडूचा योग्य पद्धतीने अभ्यास करुन मारलेला फटका हे गुण विराटला इतरांपेक्षा वेगळं ठरवतात. गोलंदाने टाकलेला चेंडू कसा येणार आहे हे विराट आधीच ओळखतो. महान खेळाडूंकडे हा गुण असतो. आतापर्यंत मी पाहिलेल्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी विराट एक आहे.” आनंदबाझार पत्रिका या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत लिली बोलत होते.

पर्थ कसोटी सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र या सामन्यातही विराटने आपलं २५ वं कसोटी शतक झळकावून आपला फॉर्म अजुनही कायम असल्याचं दाखवून दिलं. याचसोबत लिली यांनी भारताच्या जलदगती गोलंदाजांचंही कौतुक केलं. ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या १-१ अशा बरोबरीत आहे. २६ डिसेंबरपासून दोन्ही संघांमध्ये तिसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे या सामन्यात बाजी मारुन कोण आघाडी घेतं याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – विराटने आपली आक्रमकता कायम टिकवावी – झहीर खान