विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटी आश्वासक सुरुवात केली आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला १९५ धावांत गुंडाळल्यानंतर दिवसाअखेरीस भारताने मयांक अग्रवालच्या मोबदल्यात १ बाद ३६ पर्यंत मजल मारली. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाचं फलंदाज अपयशी ठरले. पहिल्या दिवशी केलेल्या भारतीय संघाच्या खेळीवर कर्णधार विराट कोहलीनं ट्विट केलं आहे. पहिल्या कसोटी सामन्यानंतर विराट कोहली मायदेशी परतला आहे.

विराट कोहलीनं ट्विट करत भारतीय संघाचं कौतुक केलं आहे. विराट कोहलीनं ट्विटमध्ये म्हटलेय की, ‘दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिला दिवस आपल्यासाठी शानदार राहिला आहे. गोलंदाजांनी दमदार प्रदर्शन केलं आहे. आजच्या दिवसाचा शेवटी जबरदस्त.’ विराट कोहलीनं मायदेशी परतताना भारतीय संघाचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला होता.


नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला नंतर पश्चाताप करावा लागला. जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन आश्विन यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडलं. मार्नस लाबुशेन आणि ट्रॅविस हेड यांचा अपवाद वगळता एकही ऑस्ट्रेलियन फलंदाज भारतीय गोलंदाजीचा सामना करु शकला नाही. लाबुशेनने ४८ तर हेडने ३८ धावा केल्या. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराहने ४, आश्विनने ३ तर पदार्पणाचा कसोटी सामना खेळणाऱ्या मोहम्मद सिराजनेही २ बळी घेत आपली चमक दाखवली. १९५ धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवातही खराब झाली. सलामीवीर मयांक अग्रवाल पहिल्याच षटकात स्टार्कच्या गोलंदाजीवर एकही धाव न काढता माघारी परतला. पहिल्याच षटकात बसलेल्या या फटक्यामुळे टीम इंडिया बॅकफूटवर गेली. परंतू शुबमन गिलनेही काही सुरेख फटके खेळत संघावरचं दडपण कमी केलं. ३८ चेंडूत २८ धावांच्या खेळीत गिलने ५ चौकार लगावले. दुसऱ्या बाजूने पुजारानेही त्याला उत्तम साथ दिली. अखेरच्या सत्रांत फारशी जोखीम न स्विकारता भारतीय फलंदाजांनी षटकं खेळून काढत १ बाद ३६ वर पहिल्या दिवसाचा खेळ संपवला.