रांचीच्या मैदानात खेळवण्यात येणाऱ्या तिसऱ्या वन-डे सामन्यात भारताची फलंदाजी पुन्हा एकदा कोलमडली. दोन्ही सलामीवीरांचं अपयश, आणि मधल्या फळीतल्या फलंदाजांकडून सतत होणारी निराशा ही भारतीय संघासाठी आगामी काळात चिंतेची गोष्ट ठरणार आहे. मात्र कर्णधार विराट कोहलीचा धडाकेबाज फॉर्म या सामन्यातही कायम राहिला आहे. नागपूरच्या सामन्यात शतकी खेळीने संघाचा डाव सावरणाऱ्या कोहलीने रांचीच्या मैदानातही शतक ठोकलं. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेत कोहलीने 95 चेंडूत 123 धावा केल्या. या खेळीत 16 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.

केदार जाधवसोबत कोहलीने महत्वाची भागीदारीही केली. ही जोडी भारताला विजय मिळवून देणार असं वाटत असतानाच झॅम्पाने कोहलीचा त्रिफळा उडवत भारताच्या आशेवर पाणी फिरवलं. भारतावर 32 धावांनी मात करत ऑस्ट्रेलियाने मालिकेतलं आपलं आव्हान कायम राखलं आहे. मात्र या शतकी खेळीदरम्यान विराटने अनेक विक्रमांची नोंद केली आहे.

याचसोबत वन-डे क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना कोहलीचं हे 25 वं शतक ठरलं.

300 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करताना कोहलीचं वन-डे क्रिकेटमधलं हे नववं शतक ठरलं. या यादीमध्ये कोणताही फलंदाज सध्या कोहलीच्या जवळ नाहीये. माजी श्रीलंकन खेळाडू कुमार संगकारा आणि इंग्लंडचा फलंदाज जेसन रॉय यांच्या नावावर 4 शतकं जमा आहेत.

याचसोबत कोहलीने फलंदाजीच्या सरासरीमध्येही आपलं स्थान भक्कम केलं आहे.

या मालिकेतला चौथा सामना रविवारी मोहालीच्या मैदानावर रंगणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.