भारतीय संघ ६ डिसेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. २०१८ हे वर्ष परदेश दौऱ्यांच्या दृष्टीने टीम इंडियासाठी फारसे चांगले राहिलेले नाही. भारतीय संघाने परदेश दौऱ्यावर सलग दोन कसोटी मालिका गमावल्या आहेत, पण तरीदेखील ICC कसोटी क्रमवारीतील भारत अव्वल स्थानी कायम आहे. पण आता भारताच्या अव्वल स्थानाला धोका निर्माण झाला आहे.

ऑस्ट्रेलिया मालिकेत भारताने विजय मिळवला नाही तर भारताचे अव्वल स्थान जाण्याची शक्यता निर्माण होत आहे. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे दोन संघ सध्या या स्थानाच्या जवळपास असून अव्वल स्थानासाठी भारताला टक्कर देऊ शकतात.

भारतीय संघाने १२५ गुणांसह वर्षाची सुरुवात केली होती. पण दक्षिण आफ्रिकेकडून २-१ आणि इंग्लंडकडून ४-१ अशा पराभवानंतर भारताने १० गुण गमावले. त्यानंतर घरच्या मैदानावर विंडीजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका जिंकून भारताने एक गुण कमावला आणि अव्वल स्थान कायम राखले. त्यामुळे सध्याच्या क्रमवारीत भारतीय संघ ११६ गुणांसह अव्वल क्रमांकावर आहे. त्या पाठोपाठ इंग्लंड १०८ गुणांसह दुसऱ्या तर दक्षिण आफ्रिका १०६ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. इंग्लंड २३ जानेवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान विंडीजविरुद्ध ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. तर आफ्रिकेचा संघ २६ डिसेंबर ते १५ जानेवारी दरम्यान पाकिस्तानविरुद्ध ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

भारताला अव्वल स्थान टिकवायचे असल्यास ऑस्ट्रेलियाकडून व्हाईटवॉश टाळावा लागेल. तसेच जर भारताने ४- ० अशी मालिका जिंकली, तर भारत १२० गुणांसह अव्वल स्थानी कायम राहील.