भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १५१ धावांवर गुंडाळला. जसप्रीत बुमराने ३३ धावांच्या मोबदल्यात टिपलेल्या ६ बळींच्या जोरावर भारताने पहिल्या डावात २९२ धावांची मोठी आघाडी घेतली. भारतीय संघाने पहिला डाव ७ बाद ४४३ धावांवर घोषित केला होता. त्यानंतर यजमान ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही.

तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात ऑस्ट्रेलियाने ४ गडी गमावले. जसप्रीत बुमराने कांगारूंना सळो की पळो करून सोडले होते. उपहाराआधी बुमराहने २ गडी टिपले होते. उपहारानंतरही भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा सुरूच ठेवला आणि ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळला.

बुमराहच्या या कामगिरीमुळे त्याच्यावर सर्वत्र स्तुतीसुमने उधळण्यात आली. यात माजी क्रिकेटपटू सेहवागने केलेले ट्विट भाव खाऊन गेले. सेहवागने बुमराहची स्तुती तर केलीच पण त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाही ट्विटमधून कोपरखळी मारली.

दरम्यान, बुमराहाने हॅरीस, शॉन मार्श, ट्रेव्हिस हेड, टिम पेन, लॉयन आणि हेजलवूड असे ६ गडी माघारी पाठवले. बुमराहने १५.५ षटकांमध्ये ३३ धावांच्या मोबदल्यात सहा गडी बाद केले आहेत. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवरील आतापर्यंतची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.