पहिल्या कसोटीत भारताने निर्णायक दिवशी ऑस्ट्रेलियावर ३१ धावांनी मात केली आणि १-० अशी मालिकेत आघाडी घेतली. याबाबत बोलताना भारताचा माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण याने महत्वाचे विधान केले आहे. सलामीचा सामना जिंकून भारताचा ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश देण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे आशावादी विधान केले आहे.

या दौऱ्यात भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयाचा दावेदार मानले जात होते. पाहुण्या संघाने मालिकेच्या पहिल्या लढतीत त्याची प्रचिती दिली. दरम्यान, अखेरच्या दिवशी खेळपट्टी संथ होती, पण भारताने ३१ धावांनी विजय मिळवला. ही सर्वोत्तम कामगिरी नव्हती, पण भारताने पहिला कसोटी सामना जिंकत ऑस्ट्रेलियाला निराश केले, हे सत्य आहे. ऑस्ट्रेलियात सांघिक गुणवत्तेचा अभाव आहे आणि त्यामुळे मालिकेत ते ०-१ ने पिछाडीवर पडले आहे. आता यजमान संघावर नक्कीच दडपण येईल, असे तो म्हणाला.

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या संघाने चांगल्या कामगिरीची पायाभरणी केली आहे. दोन्ही संघांदरम्यान महत्त्वाचा फरक चेतेश्वर पुजारा ठरला. त्याने वेगवेगळ्या पद्धतीने प्रभावी फलंदाजी केली. पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात त्याने काही ड्राईव्ह खेळण्याचे टाळले व स्केअर ऑफ द विकेट खेळण्यावर भर दिला. त्यात धोकाही कमी होता. तळाच्या फलंदाजांसह त्याने अप्पर कट किंवा पुलसारखे फटके खेळले, हे त्याच्या खेळीची महत्वाचे मुद्दे होते. त्यामुळे मी त्याच्या खेळीचा फॅन झालो, अशा शब्दात लक्ष्मणने पुजाराची स्तुती केली.

भारताच्या वेगवान गोलंदाजांची प्रशंसा करावी लागेल. पाचव्या दिवशी खेळपट्टी सपाट होती, पण त्यांनी शिस्तबद्ध मारा केला. भारतीय संघाकडून उर्वरित मालिकेतही याच कामगिरीची पुनरावृत्ती होईल, अशी आशा त्याने व्यक्त केली.