कुलदीप यादवकडून आणखी चांगल्या कामगिरीची आपेक्षा करू शकता असे मत भारताचे गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुण यांनी व्यक्त केले. कुलदीपच्या गोलंदाजीत विविधता आहे. कुलदीप यादवची गुगली भल्याभल्या फलंदाजांना समजत नाही. त्याची गुगली खूपच फसवी आहे, असेही भरत अरूण म्हणाले. चौथ्या दिवशीच्या खेळानंतर भरत अरूण बोलत होते.

कुलदीप यादव खेळपट्टीचा वापर चांगल्या पद्धतीने करतो. त्यामुळे फलंदाजांना त्याच्या गोलंदाजीचा अंदाज येत नाही. कुलदीप मानसिकदृष्ट्या कणखर असल्याने बर्‍याच दिवसांनी तो मोठा सामना खेळला तरी कचरला नाही. तेवढ्याच संयमाने आणि योग्य टप्यावर मारा केला. भारतीय संघ सिडनी कसोटी जिंकण्याच्या उद्देशाने मैदानावर उतरला आहे. भारताकडे २-१ आघाडी आहे. ही मालिका ३-१ने जिंकण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा असेल,असे भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी सांगितले.

चौथ्या कसोटी सामन्यावर भारतीय संघाने वर्चस्व गाजवले आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०० धावांवर आटोपला. भारताकडे सध्या ३१२ धावांची आघाडी आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात गुंडाळण्यात भारताच्या चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने महत्वाची भूमिका बजावली आहे. पहिल्या डावात कुलदीपने ९९ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले आहेत. भारताकडे ३०० पेक्षा आधीक धावांची आघाडी असल्यामुळे कोहलीने फॉलोऑन द्यायला जास्त वेळ घेतला नाही. दुसर्‍या डावाला सुरुवात झाल्यावर चारच षटकांच्या खेळानंतर परत एकदा पंचांनी खराब प्रकाशामुळे खेळ थांबवला. पाचव्या दिवशी भारताला सामना जिंकण्यासाठी दिवसभरात १० गडी बाद करावे लागणार आहेत.