Ind vs Aus : पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना धू-धू धुतलं आहे. फिंच आणि स्मिथ यांच्या शतकी खेळ्याच्या बळावर ऑस्ट्रेलियानं निर्धारित ५० षटकांत ३७४ धावांचा डोंगर उभा केला आहे. या सामन्यात शामी वगळता प्रत्येक गोलंदाजाला ६० पेक्षा जास्त धावा चोपल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी सर्वाधिक पिटाई फिरकी गोलंदाज चहलची केली आहे. चहलला १० षटकात ८९ धावा काढल्या. कांगारुंनी चहलला पाच षटकार आणि पाच चौकार लगावले आहेत. चहलला एक विकेट घेण्यात यश आलं पण त्यानं प्रति षटक ८.९ धावा दिल्या. या सामन्यात चहलनं आपलाच नकोसा विक्रम मोडत लाजिरवाना विक्रम नावावर केला आहे.

एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा देणाऱ्या फिरकी गोलंदाजाचा विक्रम चहलच्या नावावर होता. २०१९ मध्ये इंग्लंडविरोधात चहलनं १० षटकांत ८८ धावा दिल्या होत्या. या सामन्यात चहलनं आपला हाच नकोसा विक्रम मोडीत काढला आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात चहलनं १० षटकांत ८९ धावा बहाल केल्या आहेत. आता एकदिवसीय सामन्या भारताकडून सर्वाधिक धावा देणाऱ्या फिरकी गोलंदाजामध्ये चहल पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पियूष चावला आणि चौथ्या क्रमांकावर कुलदीप यादव आहे.

एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा देणारे चार फिरकी गोलंदाज –

चहल – ८९ धावा (ऑस्ट्रलिया विरुद्ध २०२०)
चहल – ८८ धावा (इंग्लंडविरोदात २०१९ )
पियूष चावला – ८५ धावा (पाकिस्तानविरोधात २००८)
कुलदीप यादव – ८४ धावा (न्यूझीलंडविरोधात २०२०)