भारतीय संघाला रविवारी झालेल्या एकदिवसीय सामन्यात मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. पीटर हॅंड्सकॉम्बचे शतक (११७), ख्वाजाची संयमी खेळी (९१) आणि टर्नरची तुफानी ८४ धावांची खेळी याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ३५९ धावांचे आव्हान २ षटके राखून पार केले. ५ गडी राखून सामना जिंकण्यासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. या सामन्यात युझवेन्द्र चहलला गोलंदाजीत खूपच मार पडला. त्याने १० षटकात तब्बल ८० धावा खर्च केल्या आणि त्याच्या मोबदल्यात भारताला केवळ १ बळी मिळवून दिला. त्यामुळे त्याच्यावर सर्वत्र टीका करण्यात आली. पण श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन याने मात्र त्याची पाठराखण केली आहे.

मुरलीधरन चहलच्या कामगिरीबाबत बोलताना म्हणाला, ”युझवेन्द्र चहल हा कायमच मैदानावर आला की पाच बळी टिपेल अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. तो चॅम्पियन गोलंदाज आहे आणि तो चांगली कामगिरी करूनच इथपर्यंत आला आहे. गेल्या दोन वर्षातील त्याची कामगिरी ही वाखाणण्याआधी आहे. त्याच्या गोलंदाजीच्या शैलीत वैविध्य आहे. त्याला समोरचा फलंदाज कसा बाद करावा? हे बरोबर समजते. पण एका सामन्यात त्याची कामगिरी चांगली होऊ शकली नाही, याचा अर्थ त्याच्यावरील विश्वास चाहत्यांनी कमी करावा असे होत नाही. कारण तो रोबोट (यंत्रमानव) नाही. प्रत्येक सामन्यात त्याने सर्वोत्तम कामगिरीचं केली पाहिजे असा दबाव तुम्ही त्याच्यावर टाकणे चुकीचे आहे. प्रत्येकाने त्याच्यावर टीका करण्याआधी थोडा संयम बाळगावा”

दरम्यान, चौथ्या सामन्यात धमाकेदार सुरुवात करणाऱ्या भारतीय जोडीने भारताला दीडशतकी सलामी मिळवून दिली होती. मात्र त्यानंतर भारताचा हिटमॅन रोहित शर्मा याचं शतक हुकलं. तो ९२ चेंडूत ९५ धावा करून बाद झाला. रिचर्डसनने रोहितला बाद करत अखेर १९३ धावांवर भारताला पहिला धक्का दिला. रोहितने ७ चौकार आणि २ षटकार खेचले. पण सलामीवीर शिखर धवनने धमाकेदार शतक ठोकले. त्याने चौकार लगावत ९८ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. झंझावाती शतक ठोकणाऱ्या शिखर धवनचं दीडशतक मात्र हुकलं. ११५ चेंडूत १४३ धावांची तुफानी खेळी करून तो बाद झाला आणि भारताला दुसरा धक्का बसला. त्याने १८ चौकार आणि ३ षटकार लगावले.

सलग दोन सामन्यात शतक झळकावणाऱ्या कर्णधार कोहलीला या सामन्यात फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. तो ६ चेंडूत ७ धावा करून माघारी परतला आणि भारताला तिसरा धक्का बसला. रायडूच्या जागी संधी मिळालेल्या लोकेश राहुलला चांगली सुरुवात मिळाली, मात्र तो ३१ चेंडूत २६ धावा काढून माघारी परतला आणि भारताला चौथा धक्का बसला. त्याने केवळ १ चौकार लगावला. फटकेबाजी करण्यास सुरुवात करताच ऋषभ पंत माघारी परतला. त्याने २४ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकार खेचत ३६ धावा काढल्या. पण कमिन्सच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला आणि भारताला पाचवा धक्का बसला. केदार जाधव फटकेबाजीच्या प्रयत्नात झेलबाद झाला. केदारने १२ चेंडूत १० धावा केल्या. भुवनेश्वर कुमार २ चेंडूत १ धाव काढून झेलबाद झाला. त्यामुळे भारताला सातवा धक्का बसला. १ चौकार आणि २ षटकार लगावत १५ चेंडूत २६ धावा करणारा विजय शंकर झेलबाद झाला. त्याला कमिन्सने बाद केले. युझवेन्द्र चहल शून्यावर बाद झाला. कमिन्सने स्वतःच्या गोलंदाजीवर उत्कृष्ट झेल टिपला आणि भारताला नववा धक्का दिला. कमिन्सने ५ बळी घेतले.

या आव्हानाचा पाठलाग करताना तिसऱ्या सामन्यात झंझावाती खेळी करणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच शून्यावर बाद झाला. भुवनेश्वर कुमारने त्याला त्रिफळाचीत केले. फिंच केवळ २ चेंडू खेळला. अत्यंत हुशारीने गोलंदाजी करून अनुभवी डावखुरा फलंदाज शॉन मार्श याचा बुमराहने त्रिफळा उडवला आणि ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का बसला. मार्शने केवळ ६ धावा केल्या. सुरुवातीलाच दोन धक्के बसल्यामुळे ऑस्ट्रेलियाने संथ सुरुवात केली. ३५९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना १२ व्या षटकात पाहुण्या संघाचे अर्धशतक पूर्ण झाले. ख्वाजा – हॅंड्सकॉम्ब जोडीने तब्बल दीडशेहून अधिक धावांची भागीदारी केली. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाची जमलेली जोडी अखेर बुमराहने फोडली. गेल्या सामन्यात शतक ठोकणाऱ्या उस्मान ख्वाजाला त्याने झेलबाद केले. ख्वाजाने ९९ चेंडूत ९१ धावा केल्या. ख्वाजाचे शतक हुकले मात्र पीटर हॅंड्सकॉम्बने ९२ चेंडूत संघर्षपूर्ण शतक पूर्ण केले. लगेचच धोकादायक खेळी करण्याची क्षमता असलेला मॅक्सवेल स्वस्तात माघारी परतला. १३ चेंडूत २३ धावा करून तो बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का बसला. पाठोपाठ संघर्षपूर्ण शतक ठोकणारा पीटर हॅंड्सकॉम्ब झेलबाद झाला आणि ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का बसला. त्याने १०५ चेंडूत ११७ धावा केल्या. यात ८ चौकार आणि ३ षटकार समाविष्ट होते. त्यानंतर मात्र टर्नरने झंझावाती खेळी केली. त्याने ४३ चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद ८४ धावा केल्या.