विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने बांगलादेशविरुद्ध इंदूर कसोटी सामन्यात १ डाव आणि १३० धावांनी दणदणीत विजय मिळवला. २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० ने आघाडी घेतली. भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात भेदक मारा करत बांगलादेशच्या फलंदाजांचं कंबरडं मोडलं. या विजयासह भारताने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत गुणांचं त्रिशतक झळकावलं आहे. याचसोबत भारताने या स्पर्धेत आपलं अव्वल स्थानही कायम राखलं आहे.

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करत असताना बांगलादेशचा संघ केवळ १५० धावांवर गारद झाला. यानंतर मयांक अग्रवालचं द्विशतक आणि त्याला इतर फलंदाजांनी दिलेली साथ या जोरावर भारताने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली. भारताने आपला पहिला डाव ४९३ धावांवर घोषित केला.

अवश्य वाचा – IND vs BAN : इंदूर कसोटीत भारताचा डावाने विजय ! कर्णधार विराटचा धोनीला धोबीपछाड

प्रत्युत्तरादाखल बांगलादेशची दुसऱ्या डावातही खराब सुरुवात झाली. मोहम्मद शमी, रविचंद्रन आश्विन, उमेश यादव आणि इशांत शर्मा यांनी टिच्चून मारा करत बांगलादेशची झुंज मोडून काढली. दुसऱ्या डावात बांगलादेशकडून मुश्फिकुर रहिमने ६४ धावांची खेळी केली, मात्र त्याची झुंज अपयशीच ठरली.

अवश्य वाचा – IND vs BAN : दुसरा डाव शमीचा ! पटकावला दोन वर्षांत सर्वोत्तम गोलंदाज बनण्याचा बहुमान