भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील इंदूर येथील कसोटी सामन्यावर यजमान भारतीय संघाने पूर्णपणे पकड बसवली आहे. मयांक अग्रवाल आणि अजिंक्य रहाणेने केलेल्या आक्रमक खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात आघाडी घेतली आहे. मात्र भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर या कसोटी सामन्यात एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.

दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. अबु जायेदने भारताला दोन धक्के दिले. पुजारा आणि कर्णधार विराट कोहलीला माघारी धाडत जायदेने बांगलादेशला दणक्यात सुरुवात करुन दिली. कर्णधार विराट कोहली जायेदच्या गोलंदाजीवर भोपळाही न फोडता माघारी परतला. बांगलादेशविरुद्ध शून्यावर माघारी परतणारा विराट दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी २००४ साली सौरव गांगुली वन-डे सामन्यात शून्यावर बाद झाला होता. यानंतर तब्बल १५ वर्षांनी भारतीय कर्णधारावर ही नामुष्की ओढावली आहे.

मागील ११ डावांमध्ये विराट कोहलीची शून्यावर बाद होण्याची ही तिसरी वेळ ठरली. मात्र यानंतर अजिंक्य रहाणे आणि मयांक अग्रवालने संघाचा डाव सावरत भारताची बाजू वरचढ केली. मयांक अग्रवालने यादरम्यान आपलं शतकं झळकावलं असलं तरीही अजिंक्य रहाणेचं शतक थोडक्यात हुकलं.